३९० कृत्रिम टॅंक, झोननिहाय २४ फिरते विसर्जन कुंड : एक हजारावर कर्मचारी तैनात
नागपूर : सर्वत्र मोठ्या हर्षोलासात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची शुक्रवारी 9 सप्टेंबर रोजी सांगता होत आहे. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. शुक्रवारपासून श्री गणेशाचे विसर्जन होणार असून नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विविध पाऊल उचलण्यात आले आहे तसेच 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीसाठी कोराडी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारे गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात झोननिहाय कृत्रिम टॅंक आणि फिरत्या मोबाईल कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी शहरातील दहाही झोन अंतर्गत २०४ पेक्षा अधिक ठिकाणी ३९० कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जनस्थळांची संपूर्ण माहिती नागरिकांना घरबसल्या मिळावी, याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे https://www.nmcnagpur.gov.in//visarjan-location ही वेब लिंक ही जारी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये याकरिता महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. स्वतः मनपा आयुक्त तथा प्रशासकराधाकृष्णन बी. हे शहरातील विसर्जन स्थळांना भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांच्या नेतृत्वात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या मार्गदर्शनात सर्व झोनचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, मनपाच्या स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान कामाला लागले असून १ हजाराहून अधिक कर्मचारी श्रीगणेशाच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी सज्ज झालेले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवात नेहमीच शहरातील स्वयंसेवी संस्थांचे मनपाला मोठे सहकार्य मिळते. यावर्षी सुद्धा शहरातील वेगवेगळ्या विसर्जनस्थळी स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मनपाला सहकार्य करीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत.
शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, नाईक तलाव, लेंडी तलाव, पोलिस लाईन टाकळी यासह सर्वच तलावांमध्ये विसर्जनास पूर्णत: बंदी आहे. या सर्व ठिकाणी मनपाद्वारे लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. कृत्रिम टॅंकच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. कृत्रिम टॅंकच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाईट लावण्यात आले आहेत. याशिवाय झोननिहाय २४ रबरी पूल व जागोजागी निर्माल्य संकलनासाठी ९३ कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत.
प्रभागनिहाय विसर्जन टँक व निर्माल्य कलशाची व्यवस्था
शहरात दहाही झोनमध्ये प्रभागनिहाय विविध २०४ भागात एकूण ३९० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. ४ फूटाखालील सर्व श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये व्हावे म्हणून चौकाचौकात व मैदानात कृत्रिम टॅंक तयार करण्यात आले आहे. यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३५, धरमपेठ झोन अंतर्गत ६७, हनुमानगर झोन अंतर्गत ४८, धंतोली झोन अंतर्गत ३७, नेहरूनगर झोन अंतर्गत ४४, गांधीबाग झोन अंतर्गत ४१, सतरंजीपुरा झोन अंतर्गत २७, लकडगंज झोन अंतर्गत ४०, आशीनगर झोन अंतर्गत १५, मंगळवारी झोन अंतर्गत ३६ असे शहरात ३९० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.
झोननिहाय २४ फिरते विसर्जन कुंड
गणेश विसर्जनासाठी नागरिकांना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये याकरिता महानगरपालिकेद्वारा दहाही झोनमध्ये २४ फिरत्या विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १ वाहन, धरमपेठ झोन अंतर्गत ४ वाहन, हनुमानगर झोन अंतर्गत ४ वाहन, धंतोली झोन अंतर्गत २ वाहन, नेहरूनगर झोन अंतर्गत २ वाहन, गांधीबाग झोन अंतर्गत २ वाहन, सतरंजीपुरा झोन अंतर्गत १ वाहन, लकडगंज झोन अंतर्गत २ वाहन, आशीनगर झोन अंतर्गत २ वाहन, मंगळवारी झोन अंतर्गत ४ वाहन असे शहरात २४ फिरते विसर्जन कुंड नागरिकांच्या सेवेत तैनात करण्यात आले आहे.
4 फुटावरील मूर्तीसाठी कोराडीमध्ये विशेष व्यवस्था
चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे कोराडी तलाव परिसरात व्यवस्था करण्यात आलेली आहे. तलाव परिसरात असलेल्या ६० फूट खोल आणि १५० फूट रुंद कृत्रिम टँकमध्ये मोठ्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी ३ क्रेन सह पोकलेन आणि तीन टिप्परची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा व पोलिस प्रशासनाचे सहायता कक्षाचे स्टॉल विसर्जनस्थळी उभारण्यात आले आहे. आपात्कालीन वैद्यकीय सेवेसाठी तीन रुग्णवाहिकांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सोनेगाव आणि फुटाळा तलाव परिसरातही रुग्णवाहिकांची व्यवस्था आहे. कोराडी आणि जवळच्या परिसरातील रहिवाशांना घरगुती आणि ४ फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कोलार नदीजवळ दोन्ही बाजूला ४ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पोलिस अधीक्षक विजय मगर यांच्यासोबत कोराडी कृत्रिम विसर्जन टँकची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. गजेन्द्र महल्ले आणि सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.
नागरिकांनी नाकारली पीओपी मूर्ती
गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची स्थापना ही पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक बाब आहे. यासंबंधी कठोर कायदे सुद्धा करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने नागरिकांमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी आतापर्यंत झालेल्या गणेश विसर्जनामध्ये एक टक्क्यांपेक्षाही कमी पीओपी मूर्तींचे विसर्जन झाल्याचे दिसून आले आहे. बुधवार ७ सप्टेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील कृत्रिम विसर्जन टँकमध्ये एकूण १०२७१ मूर्तींचे विसर्जन झाले यापैकी केवळ ९३० पीओपी मूर्ती असल्याचे पुढे आले आहे. हे प्रमाण एकूण विसर्जनाच्या एक टक्के एवढेही नाही. एकूणच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत असून नागरिकांद्वारे पीओपी मूर्तींना नाकारणे ही याचीच प्रचिती आहे.
एम्प्रेस मॉलच्या समोर विशेष व्यवस्था
गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरण कामामुळे यावर्षी एम्प्रेस मॉलच्या समोर श्रींची मूर्तीच्या विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येथे मनपातर्फे 10 कृत्रिम टँक लावण्यात आले असून 4 फुटापेक्षा लहान मूर्तीचे विसर्जन येथे होणार आहे. वाहनांसाठी विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व निर्माल्य संकलनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात लोटस कल्चर एंड स्पोर्टिंग असोसिएशन आणि तेजस्विनी महिला मंडळाचे यामध्ये सहकार्य मिळत आहे.