नागपूर :- शहराची लोकवाहिनी असलेली मनपा संचालित “आपली बस” आता लवकरच नवे तंत्रज्ञान आणि स्वरूपात जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. नव्या १५९ ई-बसेस लवकरच जुन्या बसेसची जागा घेतील. महत्वाचे म्हणजे या ई-बसेसचे बाह्यरूप कसे असावे ते ठरवण्याची जबाबदारी जनतेलाच दिली जाणार आहे. नव्या ई-बसेसचे रंगरूप डिझाईन करण्यासाठी नागपूरकर जनतेकरीता मनपातर्फे एक खुली स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांकडून आलेल्या उत्कृष्ट कल्पनाचित्राची निवड आपली बसच्या बाह्यरूपासाठी केली जाणार आहे. तसेच या कल्पनाचित्राच्या रचनाकाराला १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देखील दिले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपली कल्पनाचित्रे competition.nmc@gmail.com वर अथवा मनपा आणि मनपा आयुक्तांच्या सोशल मीडिया खात्यांवर पाठवायची आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन नव्या आपली बसचे नवे रूप चितारावे, असे आवाहन मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.