नागपूर – प्रधानमंत्री कुसूम योजने अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरी, लाभार्थ्यांनी फसवे संकेतस्थळ, भ्रमणध्वनीपासून सावध असावे, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापकांनी केले आहे.
महाऊर्जा विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वर्धा व इतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सायबर सेलमध्ये तक्रारी केल्याच्या दिसून येत आहे. काही बनावट संकेतस्थळ, मोबाइल ॲप तसेच दुरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरणा करण्यास सांगितले जात आहे. अशा खोटया, फसव्या संकेतस्थळासह मोबाइल ॲपला भेट देऊ नये तसेच फसव्या दूरध्वनी, भ्रमणध्वनीच्या संभाषणाला, आवाहनाला बळी पडू नये व अशा फसव्या संकेतस्थळावर, ॲपवर कोणत्याही पध्दतीने पैशाचा भरणा करू नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक वैभवकुमार पाथोडे यांनी केले आहे.
‘प्रधानमंत्री कुसूम योजना’ राज्य सरकारच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबवण्यात येत आहे. महाऊर्जाच्या या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाइन नोंदणीसाठी महाऊर्जा कार्यालयाच्या अधिकृत https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojna-Component-B व www.mahaurja.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, जी.पी.ओ. चौक, सिव्हिल लाईन, नागपूर दूरध्वनी क्रमांक 0712-2531602, 0712-2564256 किंवा ई-मेल आयडी domedanagpur@mahaurja.com वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कार्यालय, नागपूरद्वारे करण्यात आले आहे.