नागपूर :- थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या नागपूर परिमंडळातील वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरणने घडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत तब्बल नऊ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यात खंडित करण्यात आला असल्याची माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.
नागपूर परिमंडळात म्हणजे नागपूरसह वर्धा जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सुमारे 18 लाख 82 हजारावर वीज ग्राहक असून या महिन्यात त्यापैकी 11 लाख 38 हजार 368 ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केलेला आहे. याअनुषंगाने महावितरणतर्फे थकबाकीदारांना बिल भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
थकबाकी भरण्याची मुदत संपल्यानंतर मोबाइलवरून वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस देण्यात येत आहे. त्यानंतरही बिल न भरल्यास थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. नागपूर परिमंडळात एक ते 28 जानेवारी या काळात तब्बल 9 हजार 671 ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीसाठी तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. यात नागपूर शहर मंडळातील 6 हजार 319, नागपूर ग्रामिण मंडलातील 1 हजार 436, तर वर्धा जिल्ह्यात 1 हजार 416 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या या 7 हजार 671 ग्राहकांपैकी नागपूर शहर मंडळातील 1 हजार 934, नागपूर ग्रामिण मंडळातील 483 तर वर्धा मंडलातील 471 ग्राहकांनी थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करीत एकूण 2 हजार 888 आपला वीजपूरवठा पुर्ववत करुन घेतला
मोहीम सुरूच राहणार
थकबाकीदारांविरोधात ही धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने तांत्रिक, लेखा व मानव संसाधन विभागातील महिला व पुरुष अधिकारी आणि कर्मचा-यांची विविध पथके स्थापन केली आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणकडे थकबाकीच्या संपूर्ण रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत जोडला जात आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केल्यावर थकबाकी न भरता परस्पर वीजपुरवठा जोडणाऱ्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ऑनलाइन पर्याय उपलब्ध
वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलांचा तातडीने भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाइन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाइट किंवा महावितरण अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
वीजबिलाचा‘ऑनलाइन’ भरणा केल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीज विलामध्ये पाव टक्के याशिवाय वीज बिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास 1 टक्का केल्यास ग्राहकाला सुट दिल्या जाते, याचसोबत क्रेडीट कार्ड वगळता उर्वरीत सर्व पर्यायाव्दारे वीज बिलाचा ऑनलाईन भरणा निशुल्क आहे. सबब, ग्राहकांनी त्यांच्या विज बिलाचा वेळीच भरणा करुन वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.