दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्द‍िष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित उर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम २०२४-२५ (संरक्षण क्षमता महोत्सव) १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या.

कार्यक्रमास भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे बिझनेस हेड राहूल टंडन, हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक देबाशिश बसक, बीपीसीएलचे राज्य प्रमुख राकेश सिन्हा,इंडियन ऑईलचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत गिते, जीएआयएल इंडिया लि.चे उपसंचालक मोहम्मद शफी अवान, वरिष्ठ व्यवस्थापक दिपक वाघ, रितेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी रंगमंच समुहाच्या पथनाट्याद्वारे मुलांना इंधनबचतीचा संदेश देण्यात आला. तसेच इंधन बचतीसाठी यावेळी सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, भारत सरकारने २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्द‍िष्ट असले पाहिजे.

घरातही आपण गॅस, वीज वापर, योग्य पद्धतीने केला. इमारतींवर सौर पॅनल वापरले, सिग्नलला वाहन बंद करणे अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून आपण इंधनाची बचत करू शकतो आणि शाश्वत विकास गाठू शकतो, असे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले की, १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी मोहीम राबविणार आहे. यामध्ये विद्यार्थी, तरूण, वाहन चालक, क्लिनर, कर्मचारी, शेतकरी, निवासी संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था अशा अनेकांपर्यंत पोहोचून इंधन बचतीचे महत्व, फायदे यासंदर्भात जागृती करण्यात येणार आहे. इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सायक्लोथॉन, वॉकेथॉन, चित्रकला स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश पोहोचविला जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वस्त्रोद्योग गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र पुरक - वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

Sun Feb 16 , 2025
– भारत टेक्स एक्सपोमध्ये महाराष्ट्र सोबत 380 कोटींचे सामंजस्य करार नवी दिल्ली :- वस्त्र उद्योग गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचाच परिणाम म्हणून या सुरू असलेल्या भारत टेक्स एक्सपो मध्ये महाराष्ट्रासोबत 380 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत, या करारामधून राज्यात दोन हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!