नागपूर :- दीनदयाल जन आजीविका योजनेतंर्गत शहरी उपजीविका कृती आराखडयाबाबत (City Livehoods Action Plan) नुकतीच एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा विभागीय सह आयुक्त मनोजकुमार शहा व सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथील आयोजित कार्यशाळेत नागपूर विभागात कार्यान्वित दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत आर्थिक वर्ष 2024-2025 या कालावधीत एकूण स्थापन करण्यात आलेले 14 हजार 262 बचत गट, 512 वस्तीस्तर, 37 शहरीस्तर संघ, 12 हजार 282 फिरता निधी प्राप्त बचत गट, स्वयंरोजगार कार्यक्रम, बँकेचे कर्ज प्राप्त वैयक्तिक लाभार्थी व 27 शहरी उपजिविका केंद्रांच्या कार्यांचे सादरीकरण करण्यात आले. प्रशिक्षणास नागपूर विभागातील सर्व महापालिका, नगर परिषद व नगर पंचायतीचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
आयोजित कार्यशाळेत नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबईचे राज्य अभियान व्यवस्थापक प्रसाद राजे भोसले यांनी नविन अभियानाच्या सुलभ अंमलबजावणीबाबत प्रशिक्षण दिले. यात वंचित घटकांसह नागरी गरिबांसाठी शहरांमध्ये उपजीविकांच्या संधीना प्रोत्साहन देणे व वाढ करणे याबाबींचा समावेश होता. योजनंतर्गत C-LAP पध्दतीचा धोरणात्मक कृती आराखडा त्यांनी यावेळी सादर केला.
नगरपरिषद प्रशासनाचे सहायक आयुक्त स्नेहलता कुंभार व सतीश चौधरी यांनी योजनेच्या लाभाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रविण पडोळे, रफिक शेख, नागपूर महापालिकेचे शहर व्यवस्थापक विनय त्रिकोलवार, कार्यकारी अभियंता एस.बी. मुलकलवार, सहायक महसूल अधिकारी पुष्पलता आवझे, छाया ठाकरे, लेखापाल प्रशांत मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शहर व्यवस्थापक नूतन मोरे यांनी केले व सहायक प्रकल्प अधिकारी प्रमोद लकडकर यांनी आभार मानले.