Ø पीक विमा काढण्याचा आज शेवटचा दिवस
Ø वर्धा जिल्ह्यात 99 टक्के पीक विम्याचे कवच
नागपूर :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नागपूर विभागातील 15 लाख 14 हजार 483 खातेदारापैकी 12 लाख 51 हजार शेतकऱ्यांनी (83 टक्के) पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविला आहे. पीक विमा योजनेचा उद्याचा शेवटचा दिवस असून उर्वरित शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
खरीप हंगामामध्ये पीकांच्या संरक्षणासाठी शासनाने केवळ 1 रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा नि र्णय घेतला आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्याने सहभाग घेण्यासाठी उद्या दिनांक 3 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. ज्या शेतकऱ्याने अद्याप या योजनेत सहभाग नोंदविला नाही त्यांनी आपल्या पीकांचा विमा उतरवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभागात 15 लाख 14 हजार 483 शेतकरी खातेदार असून यामध्ये 3 लाख 21 हजार 767 कर्जदार शेतकरी तर 9 लाख 29 हजार 294 बिगद कर्जदार शेतकरी आहेत. त्यापैकी 12 लाख 51 हजार 061 शेतक-याने विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. या योजनेमुळे 10 लाख 9 हजार 248 हेक्टर क्षेत्राला विम्याचे संरक्षण मिळाले आहे. यामुळे 49 कोटी 70 लाख 76 हजार रुपये विमा संरक्षण आहे.
वर्धा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये 99 टक्के शेतकऱ्यांनी म्हणजेच 2 लाख 17 हजार 056 शेतकऱ्यांनी आजपर्यंत सहभाग नोंदविला आहे. नागपूर जिल्ह्यात 1 लाख 97 हजार 427 (63 टक्के), भंडारा जिल्ह्यात 2 लाख 30 हजार 276 (96 टक्के), गोंदिया 2 लाख 8 हजार 147 शेतकरी (81 टक्के), चंद्रपूर 2 लाख 90 हजार 220 शेतकरी (87 टक्के) तर गडचिरोली जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 935 शेतकरी म्हणजेच 71 टक्के शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.
सहभागी होण्यासाठी आज शेवटचा दिवस
नागपूर विभगातील शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत प्रतिसाद वाढत असून उद्या दिनांक 3 ऑगस्ट पर्यंत विशेष बाब म्हणून केंद्र शासनाने विमा योजनेत सहभागासाठी मुदत वाढ दिली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत केवळ 1 रुपया भरुन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे.