– चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि भोपाळ सक्रीय
नागपूर :-ई बाईकची एजन्सी देण्याच्या नावाखाली आरोपींनी ५६ लाख ३७ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कपीलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. योगेश टेंभुर्णीकर, रोशन गोंडाणे दोन्ही रा. कपीलनगर आणि मुख्य आरोपी जयवंत गवस रा. रत्नागीरी आरोपींची नावे आहेत. यात नागपूर, पूर्व विदर्भासह मध्यप्रदेशातील पीडितांची फसवणूक झाली आहे.
आरोपींनी ई बाईकचा मार्केटींग हेड (विदर्भ डिस्ट्रीब्युटर्स) असल्याची बतावणी करून नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, तुमसर आणि भोपाळ येथील पीडितांकडून ५६ लाख ३७ हजार रुपये घेतले. काही ऑन लाईन तर काही रक्कम रोख स्वरुपात स्वीकारली. मात्र, डिलरशीप तर रक्कम सुध्दा परत दिली नाही. विशेष म्हणजे नागपूरातील संगीता तिवारी यांना एक लाख १० हजार रुपयात ई बाईक दिली. परंतु त्यातील बॅटरी ही बनावट आहे. नोंदणी सुध्दा नाही. हे सर्व तक्रारदार कपीलनगर ठाण्यात पोहोचले. फिर्यादी सुनील ताडोनकर रा. एमआयडीसी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
फिर्यादी सुनील यांची मित्राच्या आरोपी योगेशसोबत ओळख झाली. त्याने रोशन गोंडाणे हा मार्केटींग हेड असल्याचे फिर्यादी व त्याच्या मित्राला सांगितले. तसेच त्यांना आर. ग्रुव ग्रीन कनेक्ट प्रा. लि. याबाबत माहिती दिली. नेटवर्कींगची योजना समजावून सांगितली. ई बाईकची एजन्सी देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीला त्यांच्यावर विश्वास बसल्याने १० जानेवारी २०२३ ते ३० जून २०२४ दरम्यान तसेच मुख्य आरोपी जयवंत गवस या तिघांनी मिळून फिर्यादीकडून दोन लाख ६५ हजार रुपये घेतले. फिर्यादीला एजन्सी, कमिशन किंवा रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. आरोपींनी यासोबतच चंद्रपूर येथील अभय नवघरे यांच्याकडून ३४ लाख रुपये घेतले. राजू चव्हाण (तुमसर) यांच्याकडून ६ लाख, अतूल मेश्राम (भंडारा) यांच्याकडून अडीच लाख, अब्दुल कादीर (भद्रावती) यांच्याकडून अडीच लाख, रमेश मुसळे (भोपाळ) यांच्याकडू दोन लाख, अक्षय रहांगडाले (नागपूर) यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. अशा प्रकारे ई बाईक नेटवर्कींगच्या नावखाली एकूण ५६ लाख ३७ हजार रुपयाने फसवणूक केली.