– शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त सफाई कर्मचारी प्रोत्साहित
– दरमहा झोननिहाय कार्यक्रम घेण्याचे उपायुक्त डॉ. महल्ले यांचे आवाहन
नागपूर :- शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असणाऱ्या गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा बुधवारी (ता: 31) सत्कार करण्यात आला. संपूर्ण शहरात सेवा देणाऱ्या मनपाच्या ५० गुणवंत सफाई कामगार व ऐवजदार सफाई कामगारांचा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात मुख्य स्वचछता अधिकारी रोहिदास राठोड, वरीष्ठ स्वास्थ निरीक्षक लोकेश बासनवार, सर्व झोनल अधिकारी, स्वच्छता निरीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी ३१ जुलै शहीद सफाई सैनिक दिनाचे महत्व विषद केले. ३१ जुलै १९५४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावर झालेल्या गोळीबारात सफाई कर्मचारी भूमसिंग हे शहीद झाले. त्यांच्या स्मृतीमध्ये देशभर हा दिवस शहीद सफाई कर्मचारी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी ३१ जुलै रोजी गुणवंत स्थायी सफाई कामगार व ऐवजदारांचा सत्कार करण्यात येतो. मनपाद्वारे कोव्हिडचा काळ वगळता दरवर्षी गुणवंत कर्मचा-यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात येते.
नागरिकांचे आरोग्य जपण्याची महत्वाची जबाबदारी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांवर असून प्रत्येक सफाई कर्मचारी करीत असलेल्या कार्यामुळेच शहर स्वच्छ आणि सुंदर आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा याकरिता प्रत्येक महिन्यात झोननिहाय कार्यक्रम घेऊन स्वच्छता दुतांचा सत्कार करण्यात यावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी झोनल अधिकाऱ्यांना केले.
कार्यक्रमाचे संचालन अरुण तुर्केल यांनी केले व तर राजीव राजूरकर यांनी आभार व्यक्त केले.