– रेशीमबाग ले आऊट येथील खैरे कुणबी समाजभवन बांधकामाचे भूमिपूजन
– बिडीपेठ येथे तिरळे कुणबी समाज भवन नूतनीकरणाचे भूमिपूजन
– मानेवाडा येथील संत श्री सावता महाराज सांस्कृतिक भवनाचे डिजिटल पद्धतीने भूमिपूजन
– वारकरी भवन बांधकामाचे भूमिपुजन
नागपूर :- पंढरपूरला आषाढी किंवा कार्तिकी असो; संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी त्या ठिकाणी जातात. यात विदर्भातील वारकऱ्यांची देखील मोठी संख्या आहे. जवळपास आठशे वर्षापेक्षा जास्त ही परंपरा आपण जपली आहे. या समृद्ध परंपरेला जपणा-या वारक-यांसाठी येथे वारकरी भवन व्हावे ही सर्वांची इच्छा होती. वारकरी संप्रदायाच्या कृतज्ञतेपोटी हे वारकरी भवन आपण उभारत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वारकरी भवन बांधकामाचे भूमिपुजन आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आमदार मोहन मते यांनी ही वारकरी भवनाची संकल्पना मांडली. यासाठी आग्रह धरला. यासाठी सुमारे 18 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून नागपूरमध्ये वारकरी भवन होत असल्याचा आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
समाज संस्कारित करायचा असेल तर संतांचे विचारच आपल्यासाठी मोठी प्रेरणा आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे वैभव असलेल्या वारकरी संप्रदायासाठी उत्तम असे भवन निर्माण होत आहे याचा मनापासून आनंद आहे, अशी भावना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
मला आनंद आहे की वारकरी भवनाची निर्मिती होत आहे. माझे गाव धापेवाडा आहे. त्याला विदर्भाचे पंढरपूर म्हणतात. मी भाग्यवान आहे की, पालखी मार्ग बांधण्याची संधी मला मिळाली. धापेवाडा- आदासा मार्गही खूप सुंदर झाला आहे. त्यामुळे एकदा धापेवाड्यालाही वारीला यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले.
वारकरी भवनाविषयी…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या जागेवर वारकरी भवनाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. सुमारे 18 कोटी रुपये निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. दहा महिन्यात हे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. दुमजली ही इमारत असणार आहे. यात तळघर पार्किंग, तळमजल्यावर सभागृह, स्वयंपाक गृह, प्रथमोपचार कक्ष, पहिल्या मजल्यावर बहुउद्देशिय सभागृह, शयनगृह, डायनिंग तर दुस-या मजल्यावर शयनगृह असणार आहे.
खैरे कुणबी समाज भवनाच्या नुतनीकरणाचे भूमिपूजन
तत्पूर्वी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेशीमबाग येथे खैरे कुणबी समाज भवन कोनशिलेचे अनावरण व बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार मोहन मते, आमदार परिणय फुके, माजी आमदार सुधाकर देशमुख, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना यावेळी उपस्थित होते.
संत श्री सावता महाराज सांस्कृतिक भवनाचे डिजिटल पद्धतीने भूमिपूजन
मानेवाडा येथील संत श्री सावता महाराज सांस्कृतिक भवनाचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार मोहन मते, माजी आमदार नागो गाणार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्यासह स्थानिक रहिवाशी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या सांस्कृतिक भवनासाठी 19.64 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 13 महिन्यात या भवनाचे काम पूर्ण होणार आहे. एकूण चार मजल्याची ही इमारत असणार आहे. यात तळमजल्यावर गुरुजी जीवनी कक्ष, संस्थेचे कार्यालय, पार्किग, पहिल्या मजल्यावर सत्संग हॅाल, अध्ययन कक्ष, दुस-या मजल्यावर प्रवचन हॅाल, लायब्ररी, स्वयंपाक गृह, कार्यालय, तिस-या मजल्यावर निवासी कक्ष, अतिथी कक्ष, शयनगृह तर चौथ्या मजल्यावर निवासी कक्ष, अतिथी कक्ष आणि शयनगृह असणार आहे.
तिरळे कुणबी समाज भवन नूतनीकरणाचे भूमिपूजन
शहरातील बीडीपेठ येथील तिरळे कुणबी समाजभवनाच्या नुतनीकरणाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
बिडीपेठ, आशीर्वाद नगर येथील तिरळे कुणबी समाज भवनाच्या इमारतीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. 10 महिन्यात या समाज भवनाच्या इमारतीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. दोन मजल्याची ही इमारत असून यात तळमजल्यावर संस्थेचे कार्यालय, पार्किंग, पहिल्या मजल्यावर सभागृह, दुस-या मजल्यावर स्वयंपाक गृह, डायनिंग हॅाल, निवासी कक्ष असणार आहे.