नागपूर :- एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध केलेला प्रयत्न अनेकांच्या आयुष्यात जगण्याची उमेद निर्माण करु शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असतांना सुरु केलेल्या लोकोपयोगी मुख्यमंत्री सहाय्यता निधी वितरण उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळाला आहे. या उपक्रमाकडे प्रचंड व्यस्तेतेत असतांनाही त्यांनी स्वत: लक्ष घातल्याने सत्तांतरणापूर्वी अडीच वर्षात महिन्याला 22 लक्ष रुपये रुग्णांना मिळायचे आता ही रक्कम प्रतिमाह 54 लक्ष झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर सुरु केलेल्या अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांपैकी गरीब, निराश्रीत व असहाय जनतेला मदत देणारी प्रमुख उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना होय. या एका उपक्रमाने मुंबई मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गावा-खेड्याकडील सामान्य नागरिकांचा राबता वाढला होता.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून हृदयरोग, मेंदूरोग, नवजात बालकांचे आजार, मुत्रपिंड प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, कॉकलियर इम्प्लँट, डायलिसीस, हृदय प्रत्यारोपण, सी.व्ही.ई., ब्रोन मॅरो ट्रान्सप्लँट, खुबा प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण, जळीत रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण, अस्थिबंधन आदी गंभीर आजारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य दिले जाते.
मुंबईनंतर नागपूर येथे हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी डिसेंबर 2019 ते जून 2022 या अडीच वर्षाच्या काळामध्ये 6 कोटी 41 लक्ष 94 हजार 500 रुपयांचा निधी वितरित केला गेला. सत्ता बदलानंतर जुलै 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत 4 कोटी 92 लक्ष 61 हजार निधी वितरित केला गेला आहे. गेल्या अडीच वर्षात 1614 अर्ज मंजूर झाले तर केवळ 9 महिन्यात 714 अर्जांना मंजूरी मिळाली आहे. मागील अडीच वर्षांच्या तुलनेत उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर एका वर्षात जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेतून 5 कोटीपेक्षा अधिक मदत झाली आहे. ही मदत पूर्वी महिन्याला 22 लक्ष होती. आता महिन्याला 54 लक्ष झाली आहे.
याठिकाणी कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 5.45 या काळामध्ये एक साधा अर्ज भरुन वैद्यकीय सुविधे संदर्भात लाभ घेतला जाऊ शकतो. 1 लाख 80 हजार यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो. नागपूर येथे या कक्षाकडे लक्ष देण्यासाठी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांना या योजनेसाठी सदस्य सचिव बनविण्यात आले आहेत. साध्या अर्जावर केलेल्या मागणीला तीन सदस्यीय चमू तपासते. यामध्ये डॉ.चव्हाण यांच्यासह उपसंचालक आरोग्य व जिल्हा शल्य चिकित्सक यांचा समावेश असतो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी नागरिकांनी ई-मेलवर सुद्धा ऑनलाईन अर्ज केल्यास स्विकारण्याची सूचना केली आहे. अर्जासोबत डॉक्टरांनी केलेले रोगाचे निदान प्रमाणपत्र, हॉस्पिटलच्या खर्चाचे अंदाजपत्रक, आधारकार्ड किंवा रेशनकार्ड आवश्यक आहे. हे दस्ताऐवज cmrfnagpur@gmail.com या मेलवर पाठविल्यास अर्ज दाखल केला जातो. या ठिकाणचा दूरध्वनी क्रमांक (0712) – 2560592 असा असून कार्यालयीन वेळेत अर्ज करण्याच्या संदर्भातील मार्गदर्शनही केले जाते. या योजनेमध्ये मंजूर प्रकरणातील पैसा थेट हॉस्पिटलच्या खात्यात जमा होतो. उपचार सुरु असतांनाच ही मदत मिळते. सुटी झाल्यावर किंवा दाखल करण्यापूर्वी ही मदत मिळत नाही. रुग्ण हॉस्पिटलला असतांनाच मदत मिळते.
ही योजना आणखी लोकप्रिय होण्यासाठी व तळागाळात पोहचण्यासाठी या योजनेतील सुलभता महत्वपूर्ण ठरली आहे. देवगीरी या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील वैद्यकीय मदतीसाठी विशेष सहाय्य केले जाते. तसेच अनेक आजार पूर्वी या मदतीच्या कक्षेत येत नव्हते. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून जळीत प्रकरणे, कंबर, खुबा, गुडघा, प्रत्यारोपणासारख्या अनेक आजारांना यामध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळेच अनेकांना याचा लाभ मिळत असून नागरिकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव डॉ. रवी चव्हाण यांनी केले आहे.