मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2023-24 च्या 450 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी, सर्वांनी मिळून मुंबईचा विकास करूया – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई :- मुंबई शहर जिल्ह्याच्या 2023-24 या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 450 कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2022-23 च्या 315 कोटींच्या तुलनेत यावर्षीच्या आराखड्यात 135 कोटींची वाढ करण्यात आली आहे. पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी मिळून मुंबईचा विकास करूया, असे आवाहन मंत्री दिपक केसरकर यांनी यावेळी केले.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार अरविंद सावंत, आमदार  कालिदास कोळंबकर, अजय चौधरी, सदा सरवणकर, सुनील शिंदे, अमीन पटेल, तमिल सेलवन,  ॲड.मनीषा कायंदे, यामिनी जाधव आदींसह मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुंबई हे राज्याचे हृदय आहे. मुंबईच्या वैभवात अधिक भर घालून त्याला नवीन झळाळी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रूग्णालयांमध्ये अधिक सुविधा, कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास, पोलीस वसाहतींची दुरूस्ती, कामगार कल्याण केंद्राच्या मैदानाला आधुनिक स्वरूप देणे आदींवर भर देण्यात येणार आहे. मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात येऊन शहरात रोजगार निर्मिती वाढविण्यात येणार आहे. शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मुंबईतील फॅशन स्ट्रीट, भेंडीबाजार, बाणगंगा, भायखळा आदी ठिकाणी सायंकाळनंतर खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. याअनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातील निधी वेळेत खर्च करून दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश त्यांनी कार्यान्वयन यंत्रणांना दिले. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या ज्या मुद्यांवर अद्याप कार्यवाही झालेली नाही त्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवडी किल्ल्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यासाठी समिती तयार करण्यात यावी अशी सूचना केली. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामे हटविण्यात यावीत. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडविण्यात याव्यात. केम्प्स कॉर्नर जवळील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यापूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई जिल्हा क्षेत्रातील विविध कामांची आणि समस्यांची स्वतः पाहणी केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील मूलभूत पायाभूत सुविधा, गलिच्छ वस्ती सुधार, कोस्टल रोड प्रकल्पाच्या निधीतून समुद्र किनारी संरक्षक भिंत बांधणे आदींबाबत कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीत सन 2023-24 साठीच्या वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 450 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 19.28 कोटी तर आदिवासी उपयोजनेच्या 0.14 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तर, सन 2021-22 च्या तरतुदीमधील 99.91 टक्के रक्कम खर्च करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रारंभी जिल्हाधिकारी निवतकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून मुंबई शहरात झालेल्या विविध विकास कामांची माहिती सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आता आपल्या तक्रारी नोंदवा मनपाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर , लाईव्ह सिटी ॲप सुद्धा कार्यरत : नागरिकांना मिळणार सुलभता

Tue Nov 29 , 2022
नागपूर :- शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहे. नागरी समस्यांबाबत तक्रारी नोंदविण्यात अधिक सुलभता प्रदान करीत मनपाद्वारे आता व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. याआधी लाईव्ह सिटी ॲपवर तक्रारी मागविण्यात येत होत्या आता या ॲपच्या जोडीला मनपाने ८६००००४७४६ हे व्हॉट्सॲप क्रमांक जारी केले आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा प्रदान करतानाच त्यांच्या समस्या वेळीच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com