१ जानेवारी पासुन झाला प्रारंभ
चंद्रपूर :- पोलिओ नियमित लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर ६ आठवडे पूर्ण झाल्यावर पहिला डोस तसेच १४ आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरा डोस असे एकूण २ डोस देण्यात येतात तसेच ५ वर्षाच्या आतील मुलांनाही वर्षातून दोन वेळेस पोलिओचा ओरल डोस दिला जातो. तथापि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक १ जानेवारी २०२३ पासून f-IPV लसीचा तिसरा डोस बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर इंजेक्शनद्वारे देण्यात येणार आहे. सदर लसीकरणाच्या उद्देश हा पोलिओ उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे, सामूहिक प्रतिकार शक्ती वाढविणे आहे.
२०११ नंतर देशात पोलिओचा एकही रुग्ण आढळुन आलेला नाही, मात्र संपुर्ण सावधगिरीचा उपाय म्हणुन केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माहे जानेवारी २०२३ पासून हा तिसरा डोस समाविष्ट करण्यात येत आहे. हा f-IPV लसीचा तिसरा डोस बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे.
तरी सर्व पालकांनी डोस मधील बदल लक्षात घेऊन आपापल्या मुलांचे वयोगटा प्रमाणे बालकांना त्यांच्या वयाच्या ६ आठवडे पूर्ण झाल्यावर, १४ आठवडे पूर्ण झाल्यावर आणि ९ महिने पूर्ण झाले नंतर f-IPV चे अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा असे तीन डोस जवळच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
कसा होतो संसर्ग – पोलिओचे सूक्ष्म विषाणू असतात. ते अन्न पाण्यामार्फत तोंडावाटे शरीरात येतात. दूषित पाणी हेच त्यांचे मुख्य वाहन आहे. यात हे विषाणू 6 महिनेपर्यंत जिवंत राहू शकतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेमार्फत हे विषाणू वातावरणात मिसळतात.
लक्षणे – ताप, जुलाब, उलटया, अशक्तपणा,घास खवखवणे,मान पाठ दुखणे, तीव्र डोकेदुखी,स्नायू आकाराने लहान अथवा दुर्बल होणे.
१ जानेवारी पासुन चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओचा तिसरा डोस दिला जात आहे. पालकांनी आपल्या आपल्या बालकांना या केंद्रात आणुन लस दयावी
– डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, चंद्रपूर महानगरपालिका.
@ फाईल फोटो