३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – महाराष्ट्राच्या पदक मोहिमेत जलतरणपटू आणि तायक्वांदोपटूंची छाप

– जलतरणमध्ये सहा आणि तायक्वांदोमध्ये चार पदकांची कमाई*

– खाडे दाम्पत्याचे सोनेरी यश*

पणजी :- महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मंगळवारी सहाव्या दिवशी तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन रौप्य पदकांसह एकूण सहा पदकांची कमाई करीत छाप पाडली. यात वीरधवल आणि ऋजुता खाडे दाम्पत्याचे सोनेरी यश हे वैशिष्ट्य ठरले. याचप्रमाणे तायक्वांदोपटूंनी महाराष्ट्राला दोन सुवर्णपदकांसह चार पदके मिळवून दिली. मृणाली हर्नेकर आणि अभिजीत खोपडेने तायक्वांदोमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला. त्यामुळे महाराष्ट्राने आतापर्यंत ५४ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३७ कांस्यपदकांसह एकूण १२७ पदके मिळवत पदकतालिकेतील अग्रस्थान टिकवले आहे. सेनादल ४० पदकांसह दुसऱ्या स्थानावर (२० सुवर्ण, ११ रौप्य, ९ कांस्यपदके) आणि हरयाणा ५४ पदकांसह (१९ सुवर्ण, १८ रौप्य, १७ कांस्यपदके) तिसऱ्या स्थानावर आहे.

महाराष्ट्राच्या महिला टेनिस संघाने तामिळनाडूला नमवून अंतिम फेरी गाठली आहे, तर महिला हॉकी संघाने यजमान गोव्याला २-१ असे हरवून अभियानाला विजयाने आरंभ केला. फुटबॉलमध्ये महाराष्ट्राने गतउपविजेत्या बलाढ्य केरळला २-२ असे बरोबरीत रोखून सर्वांचे लक्ष वेधून गेले. तसेच महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तिरंदाजीतील इंडियन राऊंड प्रकारात कांस्य पदकांची संधी चालून आली आहे. नौकानयनमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू तीन गटांमध्ये अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे बुधवारी ही पदके निश्चित झाली आहेत.

—-

*जलतरण*

*खाडे पती-पत्नी वेगवान जलतरणपटू*

*महाराष्ट्राची सोनेरी हॅट्ट्रिक*

*एकूण सहा पदकांची कमाई*

महाराष्ट्राचा ऑलिम्पिकपटू वीरधवल खाडे व त्याची पत्नी ऋजुता यांनी येथे अनुक्रमे पुरुष व महिला गटात वेगवान जलतरणपटूचा मान मिळवताना मुलखावेगळी कामगिरी केली. मिहीर आंम्ब्रेने ५० मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत कांस्यपदक जिंकताना आणखी एक पदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या पलक जोशीने आजारपणावर मात करीत २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तर ऋषभ दासने या शर्यतीत रौप्य पदक मिळवले. याचप्रमाणे तुषार गीतेने प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्राने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील जलतरणात तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन रौप्य अशी एकूण सहा पदकांची कमाई केली.

वीरधवलने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत २२.८२ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. त्याने २०१५ मध्ये स्वतःच नोंदवलेला २३ सेकंद हा स्पर्धा विक्रम येथे मोडला. त्याचा सहकारी मिहीरने याच शर्यतीत ब्रास पदक मिळवताना २२.९९ सेकंद अशी वेळ नोंदविली.

वीरधवलच्या शर्यती पाठोपाठ त्याची पत्नी ऋजुताने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत २२.४२ सेकंदांत पार केली आणि वेगवान जलतरणपटू हा किताब मिळवला. ही स्पर्धा जिंकताना तिने अवंतिका चव्हाणने राजकोट येथे गतवर्षी नोंदविलेला २६.५३ सेकंद हा स्पर्धा विक्रम मोडला.

२०० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत ऋषभ दास याने रौप्य पदक जिंकले. त्याने हे अंतर दोन मिनिटे ४.८० सेकंदात पार केले.

*आजारपणावर मात करीत पलकची सोनेरी कामगिरी*

महाराष्ट्राच्याच पलक जोशीने मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद आहे‌. तिने २०० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यत दोन मिनिटे २२.१२ सेकंदात पार करून सुवर्णपदक जिंकले. आज तिने प्राथमिक फेरीतून आठव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र जिद्दीच्या जोरावर तिने शेवटच्या १०० मीटर्समध्ये आघाडी घेत सोनेरी यश खेचून आणले. दोन दिवसांपूर्वी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार करावे लागले होते. आज सकाळी तिने पात्रता फेरीत भाग घेतला आणि आठवा क्रमांकासह अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले.

*प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये तुषार गितेला कांस्यपदक*

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तुषार गीतेने प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये कांस्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शानदार सलामी दिली. या स्पर्धेमध्ये त्याचे हे पहिलेच पदक आहे. त्याने २४९.९० गुण नोंदवले. तो मुंबई येथील खेळाडू असून रेल्वे संघाकडून त्याने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

*वॉटरपोलोच्या दोन्ही गटांत महाराष्ट्राचे धडाकेबाज विजय*

महाराष्ट्राच्या संघांनी वॉटरपोलोमध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटांत एकतर्फी विजय नोंदवत आगेकूच कायम राखली. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने मणिपूरचा २८-३ असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राचा हा पहिला सामना होता. महिलांच्या गटात महाराष्ट्राने आसाम संघाचा २५-१ असा दारुण पराभव केला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय आहे. काल त्यांनी मणिपूर संघाची धूळधाण उडवली होती.

—-

तायक्वांदो

महाराष्ट्राला दोन सुवर्णपदकांसह चार पदके

महाराष्ट्र संघाची युवा खेळाडू मृणाली हर्नेकर आणि अभिजीत खोपडेने मंगळवारी तायक्वांदोमध्ये सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.

महिलांच्या वैयक्तिक पुमसाई गटात मृणालीने सर्वाधिक ६.८१ गुणांसह अव्वल स्थानी धडक मारली. तिने या गटात केरळच्या लाया फातिमा सीके हिला मागे टाकले. साक्षी पाटीलने ४६ किलोखालील गटात रौप्यपदकाची कमाई केली.

५४ किलोखालील गटात अभिजीतने सोनेरी यश मिळवले. आसामच्या निर्मल कश्यपला रौप्यपदक मिळाले. तसेच वंशप्रेम ठाकूरने पुरुषांच्या पुमसाईमध्ये गटात कांस्यपदक पटकावले.

सुवर्ण : मृणाली हर्नेकर

सुवर्ण : अभिजीत खोपडे

रौप्य : साक्षी पाटील

कांस्य : वंशप्रेम ठाकूर

—-

*हॉकी*

*महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाचा विजयारंभ*

*गोव्यावर २-१ अशी मात; अक्षता, प्रियांकाचा एकेक गोल*

अक्षता ढेकळेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने यजमान गोव्याला २-१ असे हरवून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अभियानाला विजयाने आरंभ केला.

मापुसा येथील पेड्डीम क्रीडा संकुलात झालेल्या या ब-गटाच्या सामन्यात सातव्या मिनिटाला प्रियांका वानखेडेने मैदानी गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. दोनच मिनिटांनी अक्षताने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून महाराष्ट्राची आघाडी २-० अशी वाढवली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. परंतु तिसऱ्या सत्रात ३१व्या मिनिटाला मनिताने गोव्याचा पहिला नोंदवला. त्यानंतर चौथ्या सत्रात गोव्याचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न महाराष्ट्राच्या बचाव फळीने हाणून पाडले. त्यामुळे हा विजय साकारता आला. महाराष्ट्राचा पुढील सामना गुरुवारी झारखंडशी होणार आहे.

—-

*रोल बॉल*

*महाराष्ट्राच्या महिला संघाची विजयी सलामी*

*आज उपांत्य फेरी गाठण्याची संधी*

युवा कर्णधार श्वेता कदमच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला रोल बॉल संघाने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शानदार विजय सलामी दिली.

महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघावर ६-४ अशा फरकाने दणदणीत विजय साजरा केला. मानसी पाटील, महेक आणि श्वेता कदम यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला मोठा विजय नोंदवता आला. मुख्य प्रशिक्षक अमित पाटील यांनी विजय सलामीसाठी खास डावपेच आखले होते.

महाराष्ट्र संघाने सकाळच्या पहिल्या सत्रात सामन्यात चांगले सुरुवात केली. यामुळे उत्तर प्रदेश संघाचा आघाडीचा प्रयत्न वेळोवेळी अपयशी ठरला. यादरम्यान महाराष्ट्राची गोलरक्षक मानसी पाटीलची कामगिरी लक्षवेधी ठरली. तिने उत्तर प्रदेश संघाचा आघाडीचा प्रयत्न हाणून पाडला.

“स्पर्धेतील दमदार विजयने महाराष्ट्र संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे आता आम्ही हीच मोहीम कायम ठेवत सोनेरी यशाचा पल्ला निश्चितपणे गाठू. यासाठी सर्वच खेळाडू सज्ज झाले आहेत,” अशा शब्दांत कर्णधार श्वेता कदमने विजयाचा आनंद व्यक्त केला.

“महाराष्ट्र महिला संघाचा स्पर्धेतील दुसरा सामना आज मंगळवारी संध्याकाळी राजस्थान संघाविरुद्ध होणार आहे. या बलाढ्य संघाविरुद्ध विजयाने महाराष्ट्र संघाला रूपांतर फेरीतील आपला प्रवेश निश्चित करण्याची मोठी संधी आहे. यासाठी महाराष्ट्र संघाला दर्जेदार कामगिरी करावी लागणार आहे. यातून निश्चितपणे महाराष्ट्र संघ उपांत्य फेरी गाठू शकेल,” असा विश्वास मुख्य प्रशिक्षक अमित पाटील यांनी व्यक्त केला.

—–

*फुटबॉल*

*महाराष्ट्राने बलाढ्य केरळला बरोबरीत रोखले*

महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलमध्ये गतउपविजेत्या बलाढ्य केरळला २-२ असे बरोबरीत रोखून सर्वांचे लक्ष वेधून गेले.

ब-गटातील या सामन्यात २३व्या मिनिटाला केरळच्या मोहम्मद आशिकने पहिला गोल केला, तर ४२व्या मिनिटाला निजोने पेनल्टीद्वारे दुसरा गोल केला. त्यामुळे केरळने पहिल्या सत्राच्या अखेरीस २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रातही सुमारे ३२ मिनिटे गोल न झाल्यामुळे केरळ हा सामना आरामात जिंकणार अशी चिन्हे होती. पण महाराष्ट्राला हे नामंजूर होते. ८२व्या मिनिटाला मनदीपने महाराष्ट्राचे गोलचे खाते उघडले. मग पाच मिनिटांनी (८७वे मिनिट) यश शुक्लाने हेडरद्वारे प्रेक्षणीय गोल नोंदवत महाराष्ट्राला बरोबरीत नेले. त्यानंतरच्या खेळात केरळने घसमुसळा खेळ करीत बरोबरीची कोंडी सोडवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केला. पण महाराष्ट्रानेही अप्रतिम प्रतिकार केला.

या सामन्यात महाराष्ट्राचा गोलरक्षक परमबीरला पहिल्या सत्रात दुखापत झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या जागी कामरानने गोलरक्षणाची जबाबदारी सांभाळली.

—-

*तिरंदाजी*

*महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना कांस्य पदकाची संधी*

*पुरुष संघाचा बिहारवर, महिला संघाचा झारखंडवर विजय*

महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तिरंदाजीतील इंडियन राऊंड प्रकारात कांस्य पदकांची संधी चालून आली आहे. ४ नोव्हेंबरला पुरुषांचा संघ हरयाणाशी तर महिलांचा संघ गुजरातशी सामना करणार आहे.

पोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर चालू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने बिहारवर ६-० असा विजय मिळवला. पुरुषांच्या संघात रोशन साळुंखे, शुभम नागे, ऋषिकेश चांदुरकर, सुमित गुरुमुळे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या महिला संघाने झारखंड संघाला ६-२ अशा फरकाने हरवले. महिलांच्या संघामध्ये साक्षी सोनावणे, नताशा डुमणे, श्रेया खंडार, भावना सत्तगिरी यांचा समावेश आहे. मिश्र गटात मणिपूरकडून पराभव पत्करल्यामुळे महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले.

—-

*टेनिस*

*महाराष्ट्र महिला संघ अंतिम फेरीत*

महाराष्ट्र महिला टेनिस संघाने तमिळनाडूवर २-० असा विजय मिळवून मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता महाराष्ट्राचा सुवर्णपदकासाठीचा अंतिम सामना बुधवारी गुजरातशी होणार आहे.

पहिल्या लढतीत महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने तामिळनाडूच्या लक्ष्मी प्रभाला ६-३, ६-३ असे हरवले. मग दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसलेने तामिळनाडूच्या साईसमिताचा ६-२, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

—-

*नौकानयन*

*महाराष्ट्राची तीन पदके निश्चित*

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नौकानयनमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू तीन गटांमध्ये अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे बुधवारी ही पदके निश्चित झाली आहेत.

महाराष्ट्राचा ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळने पुरुषांच्या सिंगल स्कल विभागात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्याच्यापुढे आशिष फोगट (उत्तराखंड), करमजीत सिंग (पंजाब) आणि बलराज पन्वर (सेनादल) यांचे आव्हान आहे.

दुहेरीमध्ये मितेश गिल व अजय त्यागी यांनी अंतिम फेरीत यापूर्वी स्थान मिळवले आहे. त्यांच्यापुढे मध्य प्रदेश, दिल्ली व सेनादलाच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. कॉक्स फोर विभागात महाराष्ट्राला पदक मिळवण्यासाठी मध्य प्रदेश, दिल्ली व सेनादल यांच्याविरुद्ध चिवट लढत द्यावी लागणार आहे.

—-

*अ‍ॅथलेटिक्स*

*डिकॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या कुशल कुमारचे पदक हुकले*

महाराष्ट्राचा धावपटू कुशल कुमारला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समधील डिकॅथलॉनमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

१० क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेनंतर कुशलचे ३,०१२ गुण झाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या तेजस्विनी शंकरने दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकले. त्याचे ३,१३७ गुण झाले. सेनादलाचा खेळाडू रोहित रोमनने ३,१९६ गुण नोंदवत रौप्यपदक जिंकले तर केरळचा खेळाडू एन. तौफिकने ३,१०८ गुणांसह कांस्यपदक मिळवले. मंगळवारी येथे संध्याकाळच्या सत्रात मुसळधार पावसाने व्यत्यय निर्माण झाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Wed Nov 1 , 2023
– प्रभावी कामगिरी केलेल्या ‘स्वच्छता मॉनिटर्स’ विद्यार्थ्यांचा गौरव मुंबई :- विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद असते. स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ते सिद्ध केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वच्छतेचे स्वप्न विद्यार्थी प्रत्यक्षात आणत आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनून उत्कृष्ट कार्य केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मंत्री केसरकर यांच्या हस्ते ‘लेटस् चेंज अभियानांतर्गत ‘स्वच्छता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com