नागपूर :- समाज प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कलावंताना मासिक मानधन देते. यासाठी शासनाने जिल्हास्तरीय समितीही स्थापन केली आहे, मात्र नियमांना डावलून समितीने कलावंत नसलेल्या लोकांना मानधन मंजूर केले आहे. असा आरोप पत्रकार भवन येथील पत्रपरिषदेच्या माध्यमातून भारतीय लोककलाकार सांस्कृतिक संस्थेचे उपाध्यक्ष बाबारावर दुपारे यांनी राजकुमार धुले आणि प्रमोद बन्सोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खोटी कागदपत्रे सादर करून शासनाकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. कलावंत नसलेल्या लोकांना मिळत असलेल्या मानधनाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी. कलाकारांना मासिक वेतनासाठी समितीकडे अर्ज करावा लागतो. ५० वर्षांवरील कलाकारांना विविध पुरावे सादर करून अर्ज सादर करावे लागतात, मात्र विद्यमान अध्यक्ष राजकुमार घुले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या योजनेचा लाभ नागपूर जिल्ह्यातील अनेक कलाकारांना मिळवून दिला आहे, ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नाही. असे अनेक अल्पवयीन व पात्रता नसलेल्या कलाकारांचे मासिक वेतनाचे प्रस्ताव त्यांच्या संस्थेमार्फत अर्जासोबत खोटी व बनावट कागदपत्रे जोडून सादर करण्यात आले व ते मंजूरही झाले. यातील अनेक बिगर कलाकारांना अजूनही हे मानधन नियमित मिळत आहेत. यामध्ये तो स्वत:ही सामील आहे. अशी माहिती देण्यात आली. यावेळी शाहीर अनिरुध्द शेवाळे, मोरेश्वर मेश्राम, प्रकाश काळे, दिपमाला मालेकर, राजेंद्र बावनकुळे, अंबादास नागदेवे, निशा खडसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.