यवतमाळ जिल्ह्यातील 366 आदिवासी गावांचा होणार कायापालट

Ø प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान

Ø लाभार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाशी समन्वय साधावा

Ø अभियानात सहभागाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांचे आवाहन

यवतमाळ :- आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुरु केले आहे. जिल्ह्यातील 366 आदिवासी गावांचा कायापालट या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये 12 लाख 87 हजारावर आदिवासी बांधवांचे आर्थिक व सामाजिक सक्षमिकरण अभियानातून केले जाणार आहे.

दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान राबविले जात आहे. देशातील 63 हजार तर महाराष्ट्रातील 4 हजार 979 आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील एकुण 366 गावांचा अभियानात समावेश आहे.

या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

या अभियानात 17 मंत्रालयांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध 25 उपक्रमांचा समावेश असणार आहे. त्याद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, आजीविका यामधील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे.

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सहभागी प्रत्येक मंत्रालयावर पुढील पाच वर्षात निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातींचा विकास कृती आराखडा तयार केला जाणार आहे. अभियानांतर्गत समाविष्ट असलेली आदिवासी गावे पीएम गतीशक्ती पोर्टलवर संबंधित विभागाद्वारे त्यांच्या योजनेतून मॅप केल्या जाणार आहे.

या अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना पक्की घरे, ग्रामीण भागात रस्ते, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सर्व घरांमध्ये वीज जोडणी, मोबाइल मेडिकल युनिटची स्थापना, आयुष्मान कार्ड, एलपीजी कनेक्शन, आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र, आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सिकलसेल, अँनिमियाशी लढण्यासाठी केंद्राची निर्मिती, होम स्टे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे. प्रकल्प कार्यालयाशी समन्वय साधुन या अभियानास चालना देणे, अभियानाचा एक भाग होण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाणी वापर संस्थेच्या सक्षमीकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये समृध्दी येईल - डॉ.पंकज आशिया

Fri Sep 27 , 2024
Ø राळेगाव येथे पाणी वापर संस्थांसाठी कार्यशाळा Ø चार तालुक्यातील 532 शेतकऱ्यांची उपस्थिती यवतमाळ :- बेंबळा नदी प्रकल्पामधील कालव्यासाठी स्थापन केलेल्या पाणी वापर संस्थांचे सक्षमिकरण झाल्यावरच खऱ्या अर्थाने सिंचन क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांमध्ये समृध्दी येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले. राळेगांव येथे बाभुळगात ते मारेगाव परिसरातील 118 पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि लाभार्थी शेतकऱ्यांसाठी बेंबळा पाटबंधारे विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com