Ø राळेगाव येथे पाणी वापर संस्थांसाठी कार्यशाळा
Ø चार तालुक्यातील 532 शेतकऱ्यांची उपस्थिती
यवतमाळ :- बेंबळा नदी प्रकल्पामधील कालव्यासाठी स्थापन केलेल्या पाणी वापर संस्थांचे सक्षमिकरण झाल्यावरच खऱ्या अर्थाने सिंचन क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांमध्ये समृध्दी येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.
राळेगांव येथे बाभुळगात ते मारेगाव परिसरातील 118 पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि लाभार्थी शेतकऱ्यांसाठी बेंबळा पाटबंधारे विभाग आणि ज्ञानसाधना शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी आ.प्रा.डॉ.अशोक उईके, विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.प्रमोद यादगीरवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ.आशुतोष लाटकर, ज्ञानसाधना शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष प्रियंका पाटील, कार्यकारी अभियंता गणेश राठोड आदी उपस्थित होते.
पाणी वापर संस्थेला कायद्यानुसार दिलेला हक्क आणि अधिकारामुळे भविष्यात कालवा, वितरीका आणि पाटसऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी, कालव्याने पाणी किती व कधी सोडावे यासाठी शासकीय यंत्रणेवर अवंलबून राहावे लागणार नाही. पाणी वापर संस्थेला हस्तांतरण झाल्यावर स्वायत्त अधिकार प्राप्त होईल आणि सर्व शेतकरी पाणी संस्थेचे स्वामित्व स्विकारुन मालक होतील, असे जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले.
आमदार डॉ.अशोक उईके यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कार्यशाळेत कृषी अभियांत्रिकी राहुल चव्हाण यांनी पाणी व्यवस्थापन आणि ड्रोन फवारणीचे महत्व व ड्रोनचे प्रात्यक्षिक केले. डॉ.यादगीरवार यांनी सुक्ष्म सिंचन व किड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. सहाय्यक प्राध्यापक डॉ.लाटकर यांनी रब्बी हंगामातील पिकांची निवड याबाबत माहिती दिली.
यावेळी आ.डॉ.अशोक उईके व जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांच्याहस्ते दोन पाणी वापर संस्थेला धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ज्ञानसाधनाचे सचिव मनिष भानवे यांनी कार्यक्रमाची ओळख व प्रस्तावना केली. संचलन मनोज पवार यांनी केले तर आभार मनिष भानवे यांनी मानले. कार्यशाळेला बाभुळगांव, कळंब, राळेगांव, मारेगांव तालुक्यातील सुमारे 532 शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन सहभाग घेतला.
कार्यक्रमाला सुमित बाजोरीया, तहसिदार अमित भोईटे, उपविभागीय अभियंता राहुल आवारे, माजी जिल्हा परिषद सदस्य चितरंजन कोल्हे, प्रशांत तायडे, डॉ.कुणाल भोयर, बबनराव भोगारे, पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता आशुतोष उमेकर, मयुर राजणे, अशोक कामडी आदी उपस्थित होते.