– जिल्हयात कुणबी –मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र*
नागपूर :- मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 3273 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
यापैकी कुणबी-मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र आहे.
समितीची कार्यकक्षा राज्यभर करण्यात आली आहे. समितीद्वारे संपूर्ण राज्यामध्ये सन 1967 पूर्वीच्या कुणबी, कुणबी- मराठा, मराठा-कुणबी जातीच्या नोंदी शोधणे तसेच नोंदी आढळलेले अभिलेख संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, संबंधित व्यक्तींना जात प्रमाणपत्राचे वाटप करणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 3273 कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
शासन निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरावर नोंदी शोधण्याकामी विविध कक्ष, विविध विभाग व मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी यांचा वापर करुन नोंदी शोधण्याचे काम केले आहे.
*जिल्हयात कुणबी –मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र*
जिल्ह्यामध्ये 24 ऑक्टोबर पासून कुणबी, कुणबी – मराठा, मराठा -कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या एकूण 3289 आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये 3 हजार 289 अर्जांपैकी कुणबी – मराठा एक अर्ज प्राप्त झाला आहे. प्राप्त अर्जानंतर तपासणी केल्यावर आत्तापर्यंत प्रदान करण्यात आलेल्या एकूण निर्गमित प्रमाणपत्राची संख्या 3273 आहे. यापैकी 3272 फक्त कुणबी आहे. तर एक कुणबी – मराठा प्रमाणपत्र प्रशासनामार्फत निर्गमित करण्यात आले आहे.
केवळ 16 अर्ज सध्या प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता करण्याचे कार्य शासनस्तरावर सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.