नागपूर :- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSCDCL) तर्फे पूर्व नागपुरातील ए. बी. डी. क्षेत्रातील रस्ता क्रमांक 2 च्या विकास कामामधील 28 पैकी 27 प्रकल्पबाधितांना पुनर्वसन सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते मंगळवारी (ता: 6) सदनिकेचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पोलिस उपायुक्त निकेतन कदम, माजी नगरसेवक दीपक वडिभस्मे, माजी नगरसेविका वैशाली रोहणकर, मनीषा अतकरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
स्मार्ट सिटी परियोजना अंतर्गत विकास कामातील 28 प्रकल्प बधितांना ईश्वर चिठी द्वारे “होम स्वीट होम” प्रकल्पांतर्गत ई.डब्ल्यू.एस. – जी. इमारतीमधील सदनिकांचे वाटप भाडेपट्टा तत्वावर करण्यात आले होते. आता त्यांनी उपनिबंधक कार्यालय यांचेकडून महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार मुद्रांक शुल्कचा भरणा करून सदनिकेचा भाडेपट्टा पंजीबद्ध केला आहे. त्यानुसार आज त्यांना सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला आहे.
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना आमदार कृष्णा खोपडे यांनी संगितले की, नागपूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पूर्व नागपूरचा चेहरा मोहरा बदलला आहे. गेल्या काही वर्षापूर्वी या भागात कोणी राहायला तयार नव्हते. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात परिसरात विकास होत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. तसेच या परिसरात नवीन पोलिस स्टेशन आणि अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे. लवकरच याचे देखील उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खोपडे यांनी सांगितले की, नागरिकांच्या सहकार्यामुळे हा विकास होत आहे. या कामाकरिता खोपडे यांनी नागपूर स्मार्ट सिटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, नागपूर स्मार्ट सिटी तर्फे ए. बी. डी. क्षेत्र येथील पारडी, पुनापूर, भरतवाडा आणि भांडेवाडी या क्षेत्राचा प्रभावीपणे विकास करण्यासाठी रेट्रोफीटींग तत्वावर नगर रचना परियोजना अंमलात येत आहे. “होम स्वीट होम” प्रकल्प अंतर्गत 3 इमारती बांधण्यात आल्या असून, यामधील ईडब्ल्यूएस इमारतीमधील सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. “होम स्वीट होम” प्रकल्पामध्ये सौर ऊर्जा प्रणाली, जल पुनर्भरण, हरित इमारत संकल्पना, मलनि:स्सारन प्रक्रिया केंद्र, लिफ्ट, मुलांकरिता खेळण्याची जागा, उद्यान, सुरक्षा रक्षक केबिन इ. सुविधा देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी शरीफा बानु शेख, शरद जिभकाटे, छगनलाल कनोजे, सुनील पिंपलशेंडे, यशोदा रमेश टेंभेरे, प्रमिला सुनील ठाकरे, सीता खेडेकर, राजकपूर भोवते, रामदास पंधरे यांच्या सोबत एकूण 27 प्रकल्पबाधितांना सदनिकांची किल्ली आणि ताबापत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले व आभार व्यक्त केले. या प्रसंगी स्मार्ट सिटीच्या अधिकारी नेहा झा,राजेश दुफारे, राहुल पांडे, मोईन हसन, स्वप्नील सावलकर उपस्थित होते.