Ø 10 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी पासून
नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी) लेखी व प्रात्यक्षीक परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 12 वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान तर 10 वी ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत 12 वीची प्रात्याक्षीक व तोंडी परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 तर लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे. 10 वी ची प्रात्याक्षीक व तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी 2025 तर लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान होणार आहे.
या परिक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsseboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये असे आवाहन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.