नागपूर दि.17 : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सिकलसेल नियंत्रण शिबिरात 102 कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून तपासणीमध्ये 4 रक्तनमुने सकारात्मक आले. सकारात्मक आलेले रक्तनमुने इलेक्ट्रोफोरोसीस तपासणीकरीता डागा स्त्री रुग्णालय येथे पाठविण्यात आले. जिल्हा परिषद येथील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांकरिता आज जिल्हा परिषद येथे सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिपक सेलोकर, माता बालसंगोपण अधिकारी डॉ.धावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. इनामदार, डॉ. मोटे, दिपीका गोरडे, सिकलसेल समन्वयक प्राजक्ता चौधरी, सिकलसेल समुपदेशक संजीवनी सातपुते व प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रचिती वाळके उपस्थित होते.
सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्यावेळी जेनेटीक बदलामुळे होतो. तसेच रक्तदोषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या शेवटपर्यंत सोबत राहतो. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठ्याअभावी विळ्यासारखा होतो. आई आणि वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होतो. अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून ओळख असणाऱ्या सिकलसेलग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो. या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 11 ते 17 डिसेंबर दरम्यान नियंत्रण सप्ताह राबविण्यात आला.
जिल्ह्यात सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, डागा स्त्री रुग्णालय स्तरावर करण्यात आले. यात सिकलसेलची प्राथमिक तपासणी (सोल्युबिलीटी चाचणीची) मोफत तपासणी करण्यात आल्या व तपासणीमध्ये सकारात्मक येणाऱ्या रक्तनमुण्याची इलेक्ट्रोफोरोसिस तपासणी व आवश्यकतेनुसार HPLC तपासणीही करण्यात आली. जनजागृती करण्याकरीता सिकलसेल कार्यशाळा, रॅली, पोस्टर मेकींग स्पर्धा व रांगोळी स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये सिकलसेल आजाराबाबत उपचार, प्रसार व प्रतिबंध याबाबत माहिती देण्यात आली. प्रसुतीपूर्व गर्भजल निदान तपासणीबाबत मार्गदर्शन केले.
डागा स्त्री रुग्णालयात डे केयर सेंटर सिकलसेल रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत असून या सेंटर मार्फत सर्व वाहक व रुग्ण यांना विवाहपूर्व कुटुंब नियोजन नियमित उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत समुपदेशन व औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com