गोंदिया :- आत्मप्रेरणा ही प्रत्येक युवकाचा जिवंतपणा असतो. आत्मप्ररणेतून मनुष्य आपला मुळ ध्येय्यापासून भरकटत नाही. उलट त्यातून तो अधिक जिज्ञासेने व विचाराने परिपक्व बनतो. आपले ध्येय्य गाठण्यासाठी अधिक प्रयत्न करतो. हे जरी खरे असले तरी आजच्या माहिती आणि तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगात जो युवक कौशल्य आत्मसात करेल, त्याचाच टिकाव या स्पर्धेत लागेल. त्यामुळे युवकांनो, स्पर्धेच्या युगात स्वतःला कौशल्य क्षम बनवा असे आवाहन महाराष्ट्र राज्य माहिती सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, व महाराष्ट्र माहिती सहायता केंद्राच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या ‘करिअर कट्टा’ अंतर्गत ‘विदयार्थी संवादाची शंभरी’हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत येथील गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षाच्या वतीने आयोजित ‘करिअर कट्टा’ कार्यक्रमात यशवंत शितोळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य माहिती सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. एस.यु. खान, वाणिज्य विभाग प्रमुख राकेश खंडेलवाल, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अर्चना जैन, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक धर्मवीर चव्हाण व प्रा. शहारे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कक्ष समन्वयक डॉ. अंबादास बाकरे उपस्थित होते. शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विपप्रज्वलन तसेच महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. शितोळे पुढे म्हणाले, स्पर्धेच्या युगात व्यक्तीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी केवळ शारिरीक श्रमाची नव्हे तर मानसिक तयारीची गरज आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःला सक्षम करण्यासाठी करता येऊ शकतो. आज माहिती जालाच्या क्षेत्रात अफाट माहिती, ज्ञान व कौशल्यक्षम उपक्रम उपलब्ध आहेत. या उपक्रमांचा उपयोग करित प्रत्येक विदयार्थ्याने स्वतःला सक्षम बनविले पाहीजे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राद्वारे चालविण्यात येणारा ‘करिअर कट्टा’ उपक्रम विदयार्थ्यामधील सुप्त गुणांना वाव देणारा मंच आहे. सन २०२१ मध्ये प्रारंभ झालेल्या या मंचाने आजपर्यत महाराष्ट्रातील १४०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मंचाच्या माध्यमातून रोजगाराचे नवनवीन क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे. गोंदियासारख्या आदिवासीबहूल क्षेत्रातील विदयार्थ्यानीही या मंचाचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी अन्य मान्यवरांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. तारेद्र पटले तर आभार डॉ. योगेश बैस यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रविन्द्र मोहतूरे, डॉ. परवीन कुमार, डॉ.बबन मेश्राम, प्रा. घनशाम गेडेकर, प्रा. योगेश भोयर, डॉ.मस्तान शाह यांनी सहकार्य केले.