फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ – भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा इशारा

मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हीन भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरे व त्यांच्या चेल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा खणखणीत इशारा भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मृणाल पेंडसे, भाजपा प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वर्णद्वेषी भाषेत टीका करून भास्कर जाधव यांनी समस्त ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. या बद्दल जाधव यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी , अशी मागणीही वाघ यांनी केली. 

वाघ म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी-२० परिषदेची यशस्वी सांगता झाली. जगभरात भारताची मान उंचावली ,मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा झाली. असे असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी भाजपाच्या नेत्यांचा खालच्या स्तरावर जाऊन अवमान करण्याची स्पर्धाच लावली आहे. या नेत्यांच्या बालीशपणाची कीव येते . स्वत:च्या नाकर्तेपणामुळे आज उद्धव ठाकरे यांची अवस्था करमणूक करणाऱ्या विदुषकासारखी झाली आहे असे वाघ म्हणाल्या. विदुषक निदान निखळ मनोरंजन तरी करतात पण हे कामदेखील ठाकरे आणि त्यांच्या टोळीला जमत नाही अशी कोपरखळी त्यांनी मारली. महिला मोर्चा तर्फे ठाकरे यांना विदुषकाचा पोषाख पाठवत असून हा पोषाख पाहून ठाकरे यांना आपण केवळ करमणुकीपुरते उरलो आहेत याची जाणीव होईल असेही त्या म्हणाल्या.

ठाकरे यांच्या टोळीतील सर्वज्ञानी संजय राऊत, शिवीगाळ करणारे भास्कर जाधव यांनी वेळीच तोंडाला आवर घालावा अन्यथा परिणामांस सामोरे जावे लागेल. आमचे नेते, कार्यकर्ते संस्कारी, संयमी आहेत मात्र यापुढे संयमाचा बांध फुटेल आणि त्याच भाषेत उत्तर मिळेल, असेही वाघ यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘इंडस्ट्री मिट’

Wed Sep 13 , 2023
– उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 17 सप्टेंबरला आयोजन  नागपूर :- बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेला कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि उद्योगसमूह, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात सामंजस्य करार रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी कौशल्य विकास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com