नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी
हल्लेखोर स्वतःच गेले मोहाडी ठाण्यात…
मोहाडी : वर्चस्वाच्या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील युवराज बीअर बारमध्ये घडली आहे।विशेष म्हणजे हल्लेखोर तरुणांनी स्वत: मोहाडी ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. दिनेश झाडू मारबते (28), रा. मोहाडी असे जखमीचे नाव आहे,तर सचिन ऊर्फ सोनू गजानन मेहर (37) रा. मोहाडी आणि महेश रवी चिंधालोरे रा. तुमसर असे आरोपींचे नाव आहे।जखमीला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमी दिनेश सायंकाळी मोहाडी येथील युवराज बीअर बारमध्ये गेला होता।त्याठिकाणी आरोपी सचिन व महेश आले।वर्चस्वाच्या लढाईत त्यांच्यात वाद झाला या वादात सचिन व महेशने आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने दिनेशवर वार केले।यात त्याच्या मानेला आणि चेहऱ्याला जबर दुखापत झाली आहे।जखमी दिनेशला तात्काळ मोहाडी आरोग्य केंद्रात व नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले।त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते।जखमी व हल्लेखोर गुंड प्रवृत्तीचे असल्याचे सांगण्यात आले आहे।हल्ला केल्यानंतर सचिन व महेश थेट मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी आपण हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली।या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून जखमीच्या बयानानंतर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे।पुढील तपास मोहाडी पोलिस करीत आहे.