– चोरीच्या पैशावर मौजमस्ती
नागपूर :-रेल्वे गाडीत चढताना पर्ससह एटीएम चोरणार्या आरोपीने एटीएममधून सहज रक्कम काढली. कारण एटीएम नंबर लक्षात राहात नाही म्हणून एका व्यक्तीने एटीएम कव्हरवरच कोड नंबर लिहला. ही घटना लोहमार्ग पोलिस ठाण्याअंतर्गत घडली. लोहमार्ग पोलिसांनी सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या. अब्दुल वाहीद (35) रा. ताजबाग असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्रवाशांचे साहित्य आणि पर्स चोरण्यात तो पटाईत आहे.
औरंगाबाद (बिहार) येथील रहिवासी फिर्यादी मुन्ना पाल (42) यांना हावड्याला जायचे होते. नागपूर रेल्वे स्थानकावर अहमदाबाद हावडा एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अब्दुलने त्यांचा पर्स चोरला. पर्समध्ये महत्वाचे कागदपत्रासह एटीएम कार्ड होता. विशेष म्हणजे कोड नंबर लक्षात राहात नाही म्हणून त्यांनी कव्हरवर ठळक अक्षरात कोड नंबर लिहून ठेवल. आरोपीला आयतीच संधी मिळाली. त्याने लगेच एटीएमध्ये जावून 20 हजारांची रक्कम काढली आणि फरार झाला.
काही दुर अंतरावर गाडी गेल्यावर पर्स चोरी झाल्याचे फिर्यादीला समजले. त्यांनी लगेच लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीची ओळख पटविली. लोहमार्ग निरीक्षक मनीषा काशीद यांनी आरोपीच्या शोधासाठी अमोल हिंगणे, प्रवीण खवसे आणि पप्पू मिश्रा यांचे पथक तयार केले. पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने चोरीच्या पैशावर मौजमस्ती केली. त्याच्याजवळ केवळ 1200 रुपये शिल्लक होते. तेवढी रक्कम पोलिसांनी जप्त केली.