नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये तसेच झोन कार्यालयात कार्यरत कर्मचा-यांची गुरूवारी (ता. ८) टीडीएस संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये टीडीएस नागपूर विभागातील आयकर अधिकारी रघुनंदन यांनी मार्गदर्शन केले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या कार्यशाळेमध्ये आयकर अधिकारी अनिलकुमार मीना, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, मुख्य लेखा परीक्षक गौरी ठाकुर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यशाळेमध्ये आयकर विभागाच्या अधिका-यांनी टीडीएस संदर्भातील क्लिष्ट बाबी सोप्या करून सांगितल्या तसेच टीडीएस संदर्भातील प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केले. सादरीकरणाद्वारे मान्यवर तज्ज्ञांनी टीडीएस संदर्भातील बारकाव्यांची माहिती दिली. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी देखील आपल्या शंका आणि प्रश्न मांडून त्याचे निरसन केले.
कार्यशाळेला नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागातील तसेच झोनमधील देयक लिपीक तसेच संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.