टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचा ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रम
मुंबई : सर्व क्षेत्रांच्या आणि समाजाच्या समृद्धीसाठी विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून त्याद्वारेच राज्यातील विविध विकासकामे वेगाने प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दादर येथे टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या वतीने ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास, संपादक उमेश कुमावत उपस्थित होते.
महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. 15 टक्के जीडीपी महाराष्ट्र तयार करतो. 20 टक्क्यांपेक्षा जास्त निर्यात महाराष्ट्रातून होते. सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. 38 टक्के थेट विदेशी गुंतवणूक (‘एफडीआय’) महाराष्ट्रात येते. देशाला 5 ट्रिलियन इकॉनॉमीचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्याला वन ट्रिलियनची करावी लागेल. महाराष्ट्राची लवकरात लवकर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याकडे वाटचाल करत आहोत. तंत्रज्ञानात सुधारणा करण्यात येत आहेत. यातून वेगवान विकास घडत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर
पायाभूत सुविधांचा विकास हा विकासाचा मूलमंत्र आहे हे जाणून पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे.
सेवा, उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. याद्वारे 14 जिल्हे थेट ‘जेएनपीटी’ बंदराशी जोडले जात आहेत. पाच हजार किलोमीटरचे अॅक्सेस कंट्रोल हायवे तयार करण्यात येत आहेत. समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत नेण्यात येत आहे. 25 हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक तेथे येत असून भविष्यातील स्टील हब म्हणून गडचिरोलीची नवी ओळख निर्माण होईल. नागपूर-गोवा हायवेमुळे मराठवाड्यातील पाच जिल्हे इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग होतील यामुळे शेती व उद्योगालाही चालना मिळेल. विरार-अलिबाग कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे. पहिली इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी ऑरिक सिटी आकारास येत आहे. एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोमुळे नागरिकांना सुविधा मिळत आहे.
नवी मुंबईचे विमानतळ आणि ट्रान्स हार्बर लिंक ची उभारणी याद्वारे तिसरी मुंबई आकाराला येत आहे. मच्छीमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे. ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इनोव्हेशनच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे स्टार्टअप आणि ‘इनोवेशन’चे कॅपिटल आहे. देशातील 80 हजार स्टार्टअप्स पैकी पंधरा हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. देशातील शंभर युनिकॉर्न पैकी 25 युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. इनोव्हेशनच्या माध्यमातून इकोसिस्टीम तयार करून रोजगार निर्मितीला चालना देण्यात येत आहे. डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्राची क्षमता देशात 60 टक्के झाली आहे.
जलयुक्त शिवार- 2 च्या माध्यमातून कृषी क्षेत्राला अधिक चालना
जलयुक्त शिवार- एकद्वारे 39 लाख हेक्टर जमीन रब्बीच्या पिकाखाली आली. जलयुक्त शिवार- दोनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करत कृषी क्षेत्राला अधिक चालना देण्यात येत आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून, ‘टनेल टेक्नॉलॉजी’ च्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यातील भागात आणत आहोत. याद्वारे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम करण्यात येत आहे. गोसेखुर्दच्या वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे पश्चिम विदर्भातील दुष्काळी जिल्हे दुष्काळमुक्त करण्यात येणार आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामविकासाला अधिक बळकट करण्यात येत आहे. आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल या दृष्टीने अधिक विचार करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने ॲग्री बिजनेसद्वारे गावातील प्राथमिक कृषी सोसायटी बहुउद्देशीय बनविण्यात येत आहेत. त्यांना ॲग्री बिझनेस सोसायटी करण्यात येत आहे. याद्वारे कृषी क्षेत्रात मूल्यसंवर्धन होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आरोग्य क्षेत्रातही आमूलाग्र बदल
शालेय आणि उच्च शिक्षणातही दर्जा वाढ करण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रातील सुविधांमध्येही आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येत आहे. समाजातील सर्व वंचित घटकांपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी व त्यांना घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.