– पावसाळ्यात होणारे किटकजन्य आजार टाळण्यासाठी जनजागृती अभियान
यवतमाळ :- हिवताप, डेंग्यु, चिकुनगुण्या, मेंदुज्वर, चंडिपुरा यासारखे आजार होऊ नये यासाठी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी दरवर्षी दि.1 ते 30 जुन या कालावधीत किटकजन्य आजार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जनजागरण व डेंग्यु सर्वेक्षणास जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.
पावसाळा सुरु होताच ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचतात. त्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे किटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. किटकजन्य आजार संबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा या जनजागरण मोहिमेचा उद्देश आहे.
ताप रुग्ण सर्व्हेक्षण- गृहभेटीच्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ताप रुग्णाचे रक्त नमुने तपासणी करीता घेऊन त्वरीत प्रयोगशाळेत पाठविल्या जाते. तपासणीअंती दुषीत आढळून आलेल्या रुग्णांच्या सहवासीतांचे रक्त नमुने तपासणी करीता घेतल्या जाते. डेंग्यु दुषीत रुग्णाच्या ठिकाणी रक्तजल नमुने घेऊन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील सेंटीनल सेंटरला तपासणी करीता पाठविण्यात येते. तसेच दुषित रुग्णाच्या गावात सामुहिक ताप सर्व्हेक्षण करण्यात येते.
किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण – नियमित पंधरवाडी गृहभेटीच्यावेळी एकूण भेट द्यावयाच्या घरापैकी १० टक्के घरामध्ये किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण केल्या जाते. यामध्ये नागरीकांच्या घराच्या बाहेरील वापराच्या पाण्याच्या भांड्यात डास अळी आहे का? हे पाहण्यात येते. डास अळी आढळून आल्यास असे पाण्याचे भांडे लगेच नागरीकांमार्फत खाली करुन घेण्यात येते. जे भांडे खाली करण्या योग्य नाही, अशा भांड्यात डास अळीनाशक टेमिफॉस द्रावण प्रमाणात टाकण्यात येते.
जिवशास्त्रीय उपाययोजना – पावसामुळे परीसरात साचलेले डबके, नाल्या, खड्डे तसेच कायम व तात्पुरत्या डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेवून त्यामध्ये जिवशास्त्रीय उपाययोजनेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही करण्यात येते. ज्या गावात गप्पी मासे पैदास केंद्र कार्यान्वीत नाही, अशा गावात कार्यान्वीत करुन घेण्यात येते.
धुर फवारणी – ताप उद्रेकाच्या ठिकाणी धु़रफवारणीच्या आठवड्याच्या अंतराने दोन फेऱ्या घेण्यात येते. धुरफवारणी मुळे उद्रेकाच्या ठिकाणी असलेली डास घनता कमी होण्यास मदत होते. परीणामी डासांचा प्रादुर्भाव कमी होतो ही कार्यवाही ग्राम पंचायतच्या सहकार्याने आरोग्य विभागाकडून करण्यात येते.
रिक्त कार्यक्षेत्राच्या ठिकाणी कामाचे नियोजन- ज्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्याचे पद रिक्त असल्यामुळे नागरीकांना आरोग्य सुविधा मिळत नाही, अशा ठिकाणी उपकेंद्रातील कार्यक्षेत्रात किटकजन्य, जलजन्य साथरोग उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे अशा रिक्त ठिकाणी कामाचे नियोजन करुन उपलब्ध आरोग्य कर्मचाऱ्याकडे कार्यभार सोपविण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लेखी सुचना देण्यात आल्या आहे.
स्थलांतरीत नागरीक, मजुरावर लक्ष केंद्रीत करणे – कामानिमित्य बाहेर ठिकाणी गेलेले मजुर आपापल्या गावी परत येत असतात. अशा परत आलेल्या मजुरांवर तसेच नागरीकांवर लक्ष केंद्रीत करुन पाठपुरावा तसेच त्यांच्या नोंदी अद्यायावत ठेवण्यात येत आहे. स्थलांतरीत नागरीक, मजुरांचे रक्त नमुने तपासणीस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहे.
जोखमी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नियोजन- जिल्ह्यातील किटकजन्य आजाराकरीता जोखमी आढळुन आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी विशेष किटकजन्य आजार सर्व्हेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिम यशस्वी करणे, सर्व्हेक्षण गुणवत्तापूर्वक होणे व आरडीकेद्वारे रक्त नमुने घेण्याबाबत संबंधित आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय चमुद्वारे किटकजन्य आजाराबाबत उजळणी प्रशिक्षण देण्यात आले.
आठवडयातून एक दिवस कोरडा – बाहेरील वापराचे पाण्याचे भांडे नेहमी झाकुण ठेवणे आवश्यक आहे. उघड्या भांड्यात डास अंडी देऊन डासांचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्यामुळे सर्वानी आठवड्यातुन एक दिवस ठरवून त्या दिवशी सर्व घरामधुन असे पाण्याचे भांडे संपुर्ण रिकामे करुन घ्यावे. तसेच रिकामे केलेले भांडे आतून घासून व पुसून घ्यावे, जेणेकरुन भांड्याला डासांची अंडी, अळी चिकटून राहणार नाही. या बाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
किटकशास्त्रीय अभ्यास सर्व्हेक्षण – किट समाहरकांमार्फत किटकजन्य आजार परीस्थितीचे आकलन करण्यासाठी ग्रामीण, शहरी भाग व शासकीय आदिवासी आश्रम शाळेत भेटी देऊन किटकशास्त्रीय अभ्यास सर्व्हेक्षण केलके जात आहे. किटकजन्य आजारांशी संबंधित डास अळी घनता, डास घनता, तपासून यामध्ये वाढ आढळून आल्यास संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी सुचित करण्यात येत आहे.
आरोग्य शिक्षण- गावामध्ये ग्रामसभा, गटसभा, शाळेतून विद्यार्थ्यांना तसेच गृहभेटीच्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत किटकजन्य आजाराविषयी जनजागृती करुन नागरीकांना आरोग्य शिक्षण देण्यात येते. यामध्ये परीसरातील साचलेले डबके, नाल्या वाहते करणे, बुजविणे, डासोत्पत्ती स्थानांत गप्पी मासे सोडणे, शेणाचे, खताचे उकीरडे गाववेशीपासून 500 मीटर दूर अंतरावर हलविणे, मच्छरदाणी वापर, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे, पिण्याचे पाणी झाकुण व उंचावर ठेवणे, परीसर व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यावाचत आरोग्य संस्थेस सुचना देण्यात आलेल्या आहे, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.टी.ए.शेख यांनी कळविले आहे.