– निधी थांबविल्याबद्दल जि.प. आंदोलन
नागपूर :-नागपूर जिल्हा परिषद मध्ये प्रशासक राज येताच सत्ताधारी भाजपा पक्षाने मनमानी कारभार सुरु केला आहे. मंजुरी दिलेली कामे थांबविण्याचे प्रकार जिल्हात सुरु आहे. एकटया काटोल व नरखेड तालुक्यातील 2 कोटी रुपयाच्या कामाचे वर्क आर्डर नियमबाहय पध्दतीने थांबविण्यात आले आहे. मंजुर कामे हे जनतेच्या हिताचे व जनतेच्या सोईसाठी आहे. परंतु सत्ताधारी भाजपाचे नेते मंडळी जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत आहे. सत्ताधाऱ्यांची मनमानी खपवुन घेतली जाणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी व्यक्त केले.
ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हयातील विकास कामे थांबविल्याने जिल्हा परिषदमध्ये आयोजीत ठिय्या आंदोलनामध्ये बोलत होते. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान, नागपूर अंतर्गत स्वच्छता या शिर्षकाखाली काटोल व नरखेड तालुक्यातील 31 गावामध्ये भुमीगत नालीचे बांधकाम करण्यासाठी 11 ऑक्टोंबर 2024 ला जिल्हाधीकारी, नागपूर यांनी 2 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली होती. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने हे काम करण्यात येणार होते. यासाठी खनिकर्म विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेला 40 लाख रुपये कामे सुरु करण्यासाठी दिले होते. परंतु सर्व मंजुरी मिळुन आणि जिल्हा परिषदेला निधी मिळुन सुध्दा या 31 कामांचा कार्यारंभ आदेश देण्यास जिल्हा परिषद टाळाटाळ करीत आहे.
जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासकीय राज असल्याने सत्ता भाजपा पक्षाच्या लोकांनी मनमानी कारभार करण्यास सुरुवात केली आहे. परंतु मंजुर कामे ही गावातील लोकांच्या हिताची असून कोणा एका पक्षाच्या लोकांसाठी नाही याचा त्यांना विसर पडला आहे. राज्यात सत्ता परिर्वतन झाल्यापासुन जिल्हा परिषदेच्या कामात सत्ताधाऱ्यांचा जास्तच हस्तक्षेप वाढला आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकुन विरोधकांचे मंजुर कामे थांबविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
विरोधक जरी काही कामे करीत असेल तर जनतेच्या हिताचीच असतात याचा त्यांना विसर पडला आहे. यामुळे आगामी काळात त्यांच्या मनमानी कारभार विरुध्द रस्त्यावरची जरी लढाई लढावी लागली तरी आम्ही तयार असल्याचेही सलील देशमुख यावेळी म्हणाले. या ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कामे मंजुर असलेल्या गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.
सोमवारी निर्णय देणार – सिईओ
सलील देशमुख यांच्या नेतृत्वात सिईओ विनायक महामुनी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वर्क आर्डर पर्यत सर्व प्रक्रीया झालानंतर ही कामे का थांबविण्यात आली ? असा प्रश्न सलील देशमुख यांनी सिईओ यांना विचारला असता या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. नेमक काय घडल याची माहीत घेऊन जिल्हाधीकारी यांच्या सोबत चर्चा करुन सोमवारी निर्णय देण्यात येईल असे यावेळी सिईओ यांनी सांगीतले. सोमवारी जर यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी सलील देशमुख यांनी दिला.