मीरा भाईंदर क्षेत्रात कॅन्सर रुग्णालयासाठी निधी कमी पडू देणार नाही – मंत्री उदय सामंत

नागपूर :- मुंबई महानगर क्षेत्रातील रुग्णांसाठी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याबाबत सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री  सामंत बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, जागा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला. यात भूखंड क्रमांक २१० हा रुग्णालय आणि प्रसूतीगृहासाठी आरक्षित आहे. तर भूखंड क्रमांक २११ हा वाचनालय आणि सामाजिक सभागृहासाठी आरक्षित आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णालयासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव मागवण्यात येईल. तसेच जागा आरक्षण बदलाबाबत अधिवेशनात निर्णय घेतला जाईल. हे आरक्षण पूर्णपणे बदलण्याच्या प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात कर्करोग रुग्णालयासाठी यापूर्वी निधी देण्यात आला असून निधी कमी पडू देणार नाही, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

मीरा भाईंदरचा विकास आराखडा लवकरच

मीरा भाईंदर महानगरपालिकेचा विकास आराखडा अद्याप अंतिम झाला नाही. या आराखड्याबाबत सदस्य आशिष शेलार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना मंत्री सामंत म्हणाले की, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा विकास आराखडा राज्य शासनाकडे आलेला आहे. या आराखड्याबाबत हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असून हा आराखडा लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलत आहे. कर्करोग रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे ती सुविधा लवकरच मुंबई महानगर क्षेत्रातील आणि मीरा भाईंदरमधील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे सांगून सदस्य गीता जैन यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाड येथील कंपनीतील स्फोटप्रकरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही - कामगार मंत्री सुरेश खाडे

Sat Dec 9 , 2023
नागपूर :- महाडमधील ब्ल्यू हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना मंत्री खाडे बोलत होते. महाडमधील ब्ल्यू हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीमध्ये सात कामगार ठार झाल्याची घटना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com