विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही, आचारसंहितेआधी कामे मार्गी लावण्याकरता मंत्रालयात लगबग

मुंबई :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. आज सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दलची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी चर्चा रंगली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद किती वाजता होईल याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात लगबग

तर दुसरीकडे सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. ही या महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे बोललं जात आहे. यामुळे आज मंत्रालयाबाहेर अनेक लोकांनी गर्दी केली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात लगबग पाहायला मिळत आहे. तसेच आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागले आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर न करण्याचे कारण सांगितले होते. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीमुळे सुरक्षा दल त्याठिकाणी असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक त्यानंतर जाहीर करण्यात येईल. तसेच महाराष्ट्रात पाऊस, गणपती उत्सव आणि पितृपक्षामुळे महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया जम्मू-काश्मीर आणि हरियाणानंतर करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. पण यंदा हरियाणा विधानसभेची निवडणुकांची घोषणा आधी झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टोलमाफीची घोषणा, आज रात्रीपासून अंमलबजावणीला सुरुवात

Mon Oct 14 , 2024
मुंबई :- आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आजपासून किंवा उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com