– भाजप-शिवसेना युतीचा इनसाईड इतिहासच सांगितला
अलिबाग :- शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप पक्षावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीचं नातं नेमकं कसं होतं, राजकारणात पडद्यामागे काय-काय घडामोडी घडल्या होत्या? याबाबतचा गौप्यस्फोट केला. “जेव्हा मोदींनी 400 पारचा नारा दिला तेव्हा लोकांनी काय नारा दिला? अबकी बार भाजपा तडीपार. मग तो नारा खाली आहे. त्यानंतर काय केलं? मग तो नारा खाली आला. त्यानंतर काय केलं, कुणाला किती जास्त मुलं होतात त्यांना संपत्ती देतील. अहो किती मुलं कुणाला होतील, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला राजकारणात पोर होत नाही तो आमचा काय गुन्हा आहे?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
“आमची पोरं तुम्ही पळवताय, माझे वडील तुम्ही पळवताय, मग तुमचं कर्तृत्व काय? वडिलांना आणि पोरांना पळवावं लागतंय मग तुम्ही करताय काय? मग तुमचं काय तिकडे म्हाळगी प्रबोधिनी काहीतरी आहे, त्यामध्ये चिंतन कुंथन चालायचं तिथली माणसं गेली कुठे? तो जो भाजपा होता, मला आज सुद्धा आठवतंय, त्या भाजपाबद्दल, त्या भाजपच्या त्या पिढीबद्दल, संघाच्या सुद्धा त्या पिढीबद्दल आजदेखील माझ्या मनात आदर आहे. पण ते सुद्धा मला जेव्हा भेटतात किंवा फोनवर बोलतात की, उद्धवजी तुम्ही जे करताय ते बरोबर करताय. आम्ही ज्यांच्याविरुद्ध लढलो त्यांचाच प्रचार करावा लागतोय. त्यांच्याच सतरंज्या आम्हाला उचलाव्या लागत आहेत. हे असं कधी आमच्या आयुष्यात येईल, असं कधी वाटलं नव्हतं”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.
ठाकरेंनी इतिहासातल्या घडामोडी सांगितल्या
“मला तोही दिवस आठवतोय, भाजप शिवसेनेसोबत होता तेव्हा पहिले प्रथम अटलबिहारी वाजपेयी यांचं 13 दिवसांचं सरकार आलं होतं. मी स्वत: साक्षी आहे, मी बाळासाहेबांसोबत असताना अचानक अटलजींचा फोन आला. मला असं वाटतं पलिकडे अटलींनी त्यांना सांगितलं असावं की, बाळासाहेब सध्या थोडं सांभाळून घ्या, मी तुम्हाला एकच मंत्रालय देऊ शकतो. त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं की, अटलजी मला एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल पण पहिले तुम्ही तिकडे पंतप्रधान पदावर बसा”, अशी आठवण उद्धव ठाकरेनी सांगितली.
“त्यानंतर 2014 साली बाळासाहेब ठाकरे नव्हते. तेव्हा मला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. उद्धवजी उद्या आमच्या भाजपच्या पार्लमेंट्री बोर्डाची बैठक होणार आहे. यावेळी कदाचित आम्ही नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे करणार आहोत. तुमचा काय सल्ला आहे? मी अडून असतो. मग काय केलं असतं? मी सांगितलं हरकत नाही. मोदी तर मोदी. बसा तिकडे. मोदींचा फोन आला होता. तेव्हाही मी बाळासाहेबांचा मुलगा आहे हे तुम्हाला माहिती होतं म्हणून तर तु्म्ही फोन केला होता. अमित शाह सुद्धा शिवसेनाप्रमुखांच्या तजबिजीसमोर नाक रगडायला घरी आले होते, तेव्हासुद्धा आम्ही तोच होतो. आता तुम्हाला वाटत असेल की, मी बाळासाहेबांचे विचार सोडले?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मग 2014 मध्ये एकनाथ खडसे यांनी मला फोन करुन सांगितलं होतं की, उद्धवजी आता आमच्या वरुन आदेश आला आहे. आपली युती आता टिकणार नाही. आम्ही युती तोडत आहोत. मग मोदींना हे माहिती नाही? जशी तुम्ही माझी आस्थेने चौकशी करत होता, तेव्हा तुम्ही मला फोन करुन का बोलला नाहीत की, काय गडबड आहे? तेव्हा आदेशाशिवाय तुमच्याबरोबरची युती तोडली, तरीदेखील तुम्ही प्रचाराला आलात, मग तेव्हा तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम कुठं गेलं होतं? संपूर्ण देश तुम्ही नासवून टाकला आहे. संविधान तुम्हाला का बदलायचं आहे? तर महाराष्ट्रबद्दलचा तो जो आकस आहे, जो तुमचा पदोपदी दिसतोय”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
@ फाईल फोटो