पणजी :-राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराच्या अखेरच्या दिवशी रविवारी महिलांच्या ८७ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या योगिता खेडकरने कांस्य पदक पटकावले.
योगिताने ८९ किलो स्नॅच आणि १०९ किलो क्लीन-जर्क असे एकूण १९८ किलो वजन उचलून तिसरा क्रमांक पटकावला. तिने स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. तर तिसऱ्या प्रयत्नात उचललेले ८९ किलो वजन ग्राह्य धरण्यात आले. क्लीन-जर्कमधील तीन प्रयत्नांत तिने अनुक्रमे १०३, १०७ आणि १०९ किलो वजन उचलले. महाराष्ट्राच्या रुचिका ढोरेने ८८ किलो स्नॅच व १०९ किलो क्लीन-जर्क असे १९७ किलो वजन उचलले. पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
उत्तर प्रदेशच्या पूर्णिमा पांडेने १०५ किलो स्नॅच आणि १२२ किलो क्लीन-जर्क असे एकूण २२७ किलो वजन उचलत सुवर्ण पदक मिळवले. केरळच्या एनमारिया टी हिने ८८ किलो स्नॅच आणि ११८ किलो क्लीन-जर्क असे एकूण २०६ किलो वजन उचलत रौप्य पदक प्राप्त केले.
महाराष्ट्राने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात यंदा तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण नऊ पदकांची कमाई केली आहे. अहमदाबादला गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण दोनच पदके मिळवली होती.
प्रतिक्रिया
नगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, जळगाव येथील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. यंदा महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्ये शानदार यश मिळवले आहे. या यशाचे श्रेय खेळाडूंची मेहनत, त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेला जाते.
– प्रवीण व्यवहारे, महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक