केवळ दागिने न घडवता अद्वितीय कलाकृती निर्माण कराव्यात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे रत्न आभूषण उद्योजकांना आवाहन

– राज्यपालांच्या हस्ते जगातील दुसऱ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय रत्न आभूषण प्रदर्शनाचे उदघाटन

मुंबई :- रत्न व आभूषण उद्योगात भारताला संपन्न वारसा लाभला असून हा उद्योग प्राचीन असला तरीही त्यात नित्य नवीनता आहे. रत्न आभूषण उद्योगजकांनी केवळ दागिने न घडवता एकमेव अद्वितीय कलाकृती निर्माण कराव्यात व या क्षेत्रात भारताचा आंतरराष्ट्रीय ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

मुंबईत सुरु झालेल्या पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय रत्न व आभूषण प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 8 ऑगस्ट) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा कुर्ला संकुल मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला कौशल्य उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, रत्न व आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष विपुल शाह, उपाध्यक्ष किरीट भन्साळी, ब्रँड अम्बॅसेडर ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर, ‘डी बिअर्स’ हिरे व्यापार समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष पॉल राऊली, निमंत्रक निरव भन्साळी, जॉय अलुक्कास समूहाचे व्यवस्थापक पॉल अलुक्कास तसेच विविध देशांमधून आलेले निर्यातदार, प्रदर्शक व ग्राहक उपस्थित होते.

मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय रत्न व आभूषण प्रदर्शन हे हिरे, सोने, प्लॅटिनम आणि चांदीच्या दागिन्यांचे जगातील दुसरे भव्य प्रदर्शन म्हणून नावारूपास आले असून आगामी काळात ते जगातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे प्रदर्शन होईल.

रत्न आभूषण उद्योगाने धनसंपदा निर्माण करावी, कारण धनसंपदेतूनच गरिबी निर्मूलनाचे कार्य होईल असे सांगून रत्न आभूषण उद्योजकांना काहीही अडचणी आल्यास आपण व्यक्तिशः संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आश्वस्‍त केले.

केवळ दागिना घडविल्यास त्याचे मोल दोन – तीन लाख रुपये मिळेल, परंतु सुंदर एकमेव कलाकृती असलेला दागिना घडविल्यास तसेच त्याला ब्रँड म्हणून ओळख दिल्यास त्याच दागिन्याचे मोल पाच – दहा पटीने अधिक मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.

आज भारताने रत्न आभूषण उद्योगात अनेक स्वदेशी ब्रँड तयार केले आहेत. नवीनता, संशोधन व कलाकारांचे कौशल्य वर्धन यांवर भर देऊन उद्योजकांनी रत्न आभूषण क्षेत्रात भारताचा आंतरराष्ट्रीय ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

राज्यातील 28 विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण रत्न आभूषण निर्यात संवर्धन परिषदेला विद्यापीठांसोबत कार्य करण्याचे आवाहन करीत आहे असे सांगून परिषदेने विद्यार्थ्यांना रत्न आभूषण क्षेत्रात हितधारक बनवावे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.

रत्न आभूषण उद्योजकांनी कौशल्य विकास कार्यास हातभार लावावा – मंगलप्रभात लोढा

देशातील रत्न आभूषण उद्योजक वार्षिक आंतरराष्ट्रीय रत्न आभूषण प्रदर्शनाला जगातील पहिल्या क्रमांकाचे प्रदर्शन बनवतील, असा विश्वास व्यक्त करून युवा पिढीला कौशल्य प्रशिक्षण देण्यास या क्षेत्रातील उद्योजकांनी हातभार लावावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले.

शेजारील देशांमधील भयावह स्थिती पाहता उद्योजकांनी आपला पैसा समाजासाठी वापरावा. रत्न आभूषण क्षेत्रातील प्रत्येक उद्योजकाने किमान एका युवकाला तरी कौशल्ये प्रदान करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

प्रदर्शनात जगातील ६० देशांमधून ५०,००० व्यापारी व विक्रेते, २१०० प्रदर्शक व ३६०० स्टॉल्स सहभागी होत असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष विपुल शहा यांनी यावेळी दिली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बुलढाणा येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत  कामांचा निधी तातडीने वितरित करावा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Fri Aug 9 , 2024
मुंबई :- बुलढाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, रमाई घरकुल आणि अल्पसंख्याक घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे बुलढाणा जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी आमदार श्वेता महाले यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक झाली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com