जे आम्हाला महागाईत टाकतात त्यांना आम्हाला संधी द्यायची नाही – शरद पवार

‘जनजागर यात्रा…सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात…

पुणे :- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आयोजित महागाई व बेरोजगारी विरोधात ‘जनजागर यात्रा…सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचा शुभारंभ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आला.

यावेळी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने कृतज्ञतापूर्वक सत्कार केला.

या जागर कार्यक्रमातून तुम्ही गावोगावी जाऊन इथला शेतकरी कष्ट करतोय, उत्पादन वाढवतोय हे सांगणार आहात याचा आनंद आहे पण सामान्य माणसाच्या डोक्यावरील महागाईचे संकट या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे आहे. त्यामुळे जे आम्हाला महागाईत टाकतात त्यांना आम्हाला संधी द्यायची नाही अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

जातीजातीत अंतर कसे वाढेल याची खबरदारी घेतली जाते. काहीतरी प्रश्न काढून दोन समाजात विद्वेष कसा वाढेल याची काळजी घ्यायची. हे का तर त्यांनी जी निवडणुकीच्या काळात आश्वासन दिली त्याची कोणतीही गोष्ट करण्याची अथवा कृतीत आणण्याची धमक यांच्यामध्ये नाही त्याचा परिणाम याबद्दल लोकांची नाराजी येऊ नये म्हणून लोकांना अन्य ठिकाणी लक्ष केंद्रीत करायला लावण्यासाठी कधी जातीचे, धर्माचे, भाषेचे नाव घेतात. यातून समाजात अंतर वाढविण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

तुम्ही उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहात. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार तिथे जे घडतंय ते दुरुस्त करण्याची भूमिका प्रामाणिकपणे मांडा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एखाद्या भगिनीला संधी दिल्यानंतर त्या संधीचे सोनं करण्याची कुवत ज्यांच्यामध्ये आहे त्यांची संख्या वाढेल कशी हे आपण बघूया. कर्तुत्व करण्याचा मक्ता केवळ पुरुषांसाठी नाही तर स्त्रियांना सुद्धा संधी द्या त्या तुम्हाला कर्तुत्व दाखवतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

हजारो वर्षांपासून महिला दुय्यम दर्जाचे जीणं जगते आहे. प्रत्येक युगात स्त्रियांना बरोबरीचे स्थान मिळण्यासाठी अनेक महापुरूषांनी लढा दिला.आजच्या युगात आपल्या साहेबांनी शासकीय धोरण आणून या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम केले.  या कार्याला सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान म्हणाल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना आजचा कार्यक्रम रस्त्यावरची लढाई सुरु करण्यासाठी आहे. मागील आठ वर्ष ज्यांनी वेगवेगळी वचने दिली मात्र या संपूर्ण कालखंडात कोणतेही वचन पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे महागाई, बेरोजगारी या विषयांवर बोलून आपल्याला जनतेला जागरूक करायचे आहे. या जागराची सुरुवात शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. देशात वाढलेली महगाई, रोजगार नाहीत, मात्र यावर न बोलता जातीवाद निर्माण करण्याचे काम सुरु आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी आजपासून जागर करत आहोत, जागर महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात, अत्याचाराविरोधात आहे, असे विद्या चव्हाण यांनी सांगितले.

कोरोना काळानंतर वेगळ्या स्फूर्ती व उत्साहाने आपण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहोत. शरद पवार यांनी ज्या सेनेचे सेनापती आहात त्याचे आपण सैनिक म्हणून काम करतो हे मोठे भाग्य आहे. पवार यांना कितीही विशेषण दिले तरी ते कमीच पडतील. त्यामुळे शरद पवार हे एक व्यक्ती नसून संस्था आहे. आपल्याला आगामी निवडणुकीत परिवर्तन करण्याचे काम आपण या यात्रेच्या माध्यमातून करायचे आहे. लोकांची स्मरणशक्ती तोकडी आहे. त्यामुळे देशात घडलेल्या अनेक चुकीच्या गोष्टी आपल्याला पुन्हा – पुन्हा लोकांपुढे आणणे गरजेचे आहे. महागाई आणि बेरोजगारीवर आपण अनेकदा बोलतो आहोत. शिक्षित लोकांना रोजगार नाही त्यामुळे अनेक लोक शेतीकडे वळत आहेत ते चुकीचे नाही. मात्र यात कष्ट करणारा बळीराजा कुठे जाईल याचा विचार करायला हवा. सत्ताधाऱ्यांकडून जातीवाद वाढून यातून मॉबलिंचिंग करण्याचे काम होत आहे. संविधानाची पायमल्ली होत आहे. अनेक शासकीय संस्था आपल्या मार्गाने चालविण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. यावर आपण आता आवाज उठवायला हवा, आता वेळ आली आहे की महाराष्ट्राच्या भगिनीने दुर्गेचे रुप दाखविण्याची असे आवाहन खासदार वंदना चव्हाण यांनी केले.

जनजागर यात्रेची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायची आहे. त्यासोबतच हुमुकशाहीची पोलखोल म्हणून पक्षाच्यावतीने केलेले काम लोकांपुढे मांडण्याचे काम करायचे आहे. गेले काही दिवस वृत्तवाहिन्या पाहिल्या की, मला वेदना होतात. मी राजकारणात आले ते मायबाप जनतेसाठी बदल घडविण्याची संधी शोधण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी. मात्र महिलांच्या नावे गलिच्छपणाने राजकारण सुरु आहे. महिलांबद्दल होत असलेल्या गलिच्छ राजकारणावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. कारण यासाठी मी राजकारणात आलेली नाही, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

हे गलिच्छ राजकारण सत्ताधारी करत आहे. यावर आपल्या पक्षातील कोणीही प्रतिक्रिया देऊ नये. कारण ती महिला कोणाचीतरी आई, बहीण, पत्नी असते. हे राजकारण थांबवावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी यानिमित्ताने केली.

हा जागर सावित्रीच्या लेकींचा आहे. बेरोजगारी केवढी वाढली आहे. गॅस आणि काय काय महागलं आहे या सर्व गोष्टी आपल्याला लोकांपुढे मांडायच्या आहेत असे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, पक्षाचे कोषाध्यक्ष आणि माजी आमदार हेमंत टकले प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Yogi Adityanath calls on Maha Governor; Visits Raj Bhavan Underground Bunker Museum

Thu Jan 5 , 2023
Performs Aarti of historic Sri Gundi Devi Mandir Pays respects to Chhatrapati Shivaji Maharaj Mumbai :-Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai before proceeding for his other official engagements early on Thursday (5th Jan). On the request of the Governor, Yogi Adityanath visited the 19th Century underground British Era Bunker at […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com