संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात काल 26 जुलै च्या रात्री दहा वाजतापासून जोरदार पाऊस सुरू झाला ज्यामध्ये वादळी पाऊसासह विजेच्या कडकडाटीचा समावेश होता.रात्रभर सुरू झालेला हा पाऊस आज सकाळी सहा वाजेपर्यंत सतत सुरू राहिला.मात्र या मुसळधार जोरदार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला असून कित्येक नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर कित्येकांचे धान्य वाहत गेले.तसेच शेतशिवार पाण्याखाली दिसत होते तर या पावसामुळे शेतजमीन पिकासह खरडून गेली.
कामठी तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार जोरदार पावसामुळे कामठी शहरातील नाले तुडुंब भरून वाहत होते तर येथील बुद्धनगर, कामगार नगर,रमानगर, सुदर्शन नगर, आनंद नगर, रामगढ, छावणी , सैलाब नगर, कुंभारे कॉलोनी सह येरखेडा, न्यू येरखेडा, बी बी कॉलोनी, घोरपड रोड, यशोधरा नगर यासारख्या आदी परिसरातील वस्त्या जलमय झाल्या असून कित्येकांच्या घरात पाणी शिरल्याने बहुतांश नागरिकांचे घरातील धान्य वाहून गेले आहे तसेच ग्रामीण भागातील वस्त्या परिसर सुद्धा जलमय झाला होता.कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागाला पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून शेती शिवारात पाणीच पाणी साचले आहे.
ऐन पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारली होती त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यावर दुबार पेरणी ची वेळ आली होती त्यामध्ये शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले कसाबसा शेतकरी सावरला तर काल मंगळवारी रात्रीं झालेल्या विजेच्या कडकडाट सह वादळी जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठे नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या पिकासह माती वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.
यासंदर्भात शासनाने आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घेत त्वरित पंचनामे करून शहरातील तसेच ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसांनधारक शेतकरी तसेच नागरिकांना लवकरात लवकर मदत करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.