अगदी साध्या पध्दतीने मेघेंचा वाढदिवस साजरा
नागपूर :- आज अगदी साध्या आणि घरगुती पध्दतीने ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचा 87 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून पाच वृध्दाश्रम आणि पाच दिव्यांग मुलांच्या निवासी शाळांना देणग्या आणि तेथील रहिवासी वृध्दजन तसेच विद्यार्थी यांना दत्ता मेघे यांच्या तर्फे लाडू वाटप करण्यात आले. तसेच विमलाश्रमालाही देणगी देण्यात आली.
या प्रसंगी बोलतांना दत्ता मेघे म्हणाले की, गोरगरीब आणि गरजू लोकांच्या उत्थानासाठी राबणाऱ्या समाज सेवी संस्थांना मदत करणे म्हणजे योग्य गरजूंना मदत करणे होय. ही मदत अगदी सपात्र व्यक्ती पर्यंत पोहचते. समाजातील ज्या लोकांकडे आहे त्यांनी, ज्यांच्या कडे नाही त्यांना दिले पाहिजे, असेही मेघे पुढे म्हणाले.
ज्या संस्थांना मदत देण्यात आली त्यात मातोश्री वृद्धाश्रम अदासा, पंचवटी वृध्दाश्रम उमरेड रोड नागपूर, संजीवन वृध्दाश्रम आमगाव देवळी, साई सावली वृध्दाश्रम बेलतरोडी, मातृशक्ती वृध्दाश्रम कळमना टाकळी या वृद्धाश्रमांचा तर अंध विद्यालय वानाडोंगरी, मुक बधीर मुलांची शाळा सावनेर, श्री किसन मुक बधीर विद्यालयात नारी या शाळांचा समावेश आहे.
सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानी राम इंगोले यांच्या विमलाश्रमातील, साई आश्रमातील मुलांचे आगमण झाले. त्या मुलांतर्फे मेघेंना शुभेच्छापर गाणी म्हणत आणि फुले देत त्यांना वाढदिवस साजरा केला. नंतर त्या मुलांना पाहूणचार देण्यात आला.
मेघेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळ पासूनच त्यांच्या निवासस्थानी हितचिंतक महिला पुरुषांची रिघ लागली होती. त्यात समाजातील सर्वच वर्गातील आणि सर्वच जाती धर्माच्या लोकांचा सहभाग होता. शुभेच्छा देणार्यांमध्ये प्रामुख्याने आ. मोहन मते, माजी आमदार दीना दीनानाथ पडोळे, राजेंद्र मुळक,माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी प्रकुलगुरू गौरीशंकर पाराशर यांचासह अनेक माजी न. प. अध्यक्ष नगर सेवक, डाॅक्टर, प्राध्यापक, कार्यकर्ते नागपूर, वर्धा, हिंगणा, यवतमाळ आदी ठिकाणांहून आलेल्यांचा समावेश होता. या सर्व मंडळींचे यावेळी माजी आमदार सागर मेघे आणि आ. समीर मेघे यांनी आपुलकीने स्वागत केले.