संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
वाशिम :- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या “बालस्नेही पुरस्कार २०२४” साठी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची उत्कृष्ट पोलीस अधीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा ३ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), आदिती तटकरे (मंत्री, महिला व बाल विकास विभाग), योगेश कदम (राज्यमंत्री, गृह [शहरी]), तसेच मेघना बोर्डीकर (राज्यमंत्री, महिला व बाल विकास विभाग) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अनुज तारे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गौरविण्याचा निर्णय घेतला आहे. बाल हक्क संरक्षणासाठी त्यांचे केलेले कार्य उल्लेखनीय असून, या निवडीमुळे वाशिम जिल्ह्याच्या पोलीस दलाच्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.
अनुज तारे यांच्या या निवडीबद्दल वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने बालहक्क संरक्षणाच्या दिशेने केलेल्या कार्याची प्रशंसा करत हा पुरस्कार जिल्ह्यासाठीही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.