रोहयोच्या सिंचन विहीर व वैयक्तिक योजनेच्या लाभार्थ्यांची एकदाच प्रतिक्षा यादी करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रशासनास निर्देश

Ø वारंवार ग्रामपंचायत ठरावाची गरज भासणार नाही

Ø प्रतिक्षा यादीनुसार लाभार्थ्यांना मिळणार जलद लाभ

यवतमाळ :- रोजगार हमी योजनेतून समाजाच्या विविध घटकातील लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. त्यात सिंचन विहीर, गोठा व अन्य घटकांचा समावेश आहे. या लाभासाठी ग्रामस्तरावर पात्र लाभार्थ्यांची एकदाच एकत्रित यादी करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनास दिले. यामुळे वारंवार ग्रामसभेत ठराव करावा लागणार नाही व रोहयोमध्ये निधीची अडचण नसल्याने पात्र लाभार्थ्यांना गतीने योजनांचा लाभ उपलब्ध होतील.

महसूल भवन येथे पालकमंत्र्यांची जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर निर्देश दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरींची कामे घेतली जातात. शेतकऱ्यांना आपल्या जमिनी सिंचनाखाली आणण्यासाठी रोहयोच्या या विहिरी अतिशय उपयुक्त ठरतात. अनुदानावर विहीर उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांची देखील विहिरींची मोठी मागणी आहे.

रोहयोच्या विहिरी, गोठा किंवा अन्य बाबींसाठी प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतला ग्रामसभेत ठराव करावा लागतो. त्यात काहीच लाभार्थ्यांचा विचार होत असल्याने बरेच लाभार्थी प्रतिक्षेत राहतात. या लाभार्थ्यांना आपल्याला पुढे विहीर मंजूर होईल किंवा नाही, याबाबत शाश्वती नसते. विहिरीसाठी पात्र आणि गरजू असूनही मंजूर यादीपासून वंचित राहिल्याने पात्र लाभार्थ्यांमध्ये निराशा उत्पन्न होते.

प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना योनजांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या गावात एखाद्या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांची एकत्र यादी केल्यास लाभार्थ्यांना दिलासा मिळेल. रोजगार हमी योजनेत निधीची अडचण नसल्याने सिंचन विहिरींसह इतर योजनांसाठी पात्र ठरत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची एकदाच यादी करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.

लाभार्थ्यांची नावे ग्रामसभेच्या ठरावाद्वारे मंजूर करावी लागतात. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यासाठी जिल्हाभर येत्या जुलै महिण्यात विशेष ग्रामसभा घेण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिले. यादी करतांना एकही गरजू लाभार्थी सुटू नये, सर्व पात्र लाभार्थ्यांचा समावेश करावा. लाभार्थ्याचे नाव सुटल्यास त्यांना गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपिलाची सुविधा उपलब्ध असावी. यादीतून नाव सुटले म्हणून लाभार्थी वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिले.

वारंवार ग्रामपंचायत ठराव लागणार नाही – संजय राठोड

प्रत्येक गावात विविध योजनेचे लाभार्थी असतात. वर्षवर्ष ते योजनेच्या लाभाची प्रतिक्षा करतात. ग्रामसभा ठरावाद्वारे काहीच नावे मंजूर होत असल्याने बरेच लाभार्थी प्रतिक्षेत राहते. पात्र लाभार्थ्यांची एकदाच यादी केल्यास लाभ लवकर मिळेल आणि दरवर्षी यादी तयार करणे, ठराव घेणे व इतर प्रशासकीय कामात जाणारा वेळ वाचेल. सिंचन विहीर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे प्राधान्याने विहिरीसाठी एकत्रित यादी तयार करण्याचे निर्देश दिले. ग्रामसभेत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कमीतकमी कालावधीत एक किंवा दोन टप्प्यात विहिरींचा लाभ देऊ, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी मार्जिन मनी योजना

Wed Jun 19 , 2024
यवतमाळ :- केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेतर्गंत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील सवलतीस पात्र व नव उद्योजक तरुणांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या मार्गदर्शक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com