– 28 पैकी केवळ पाच पदांवर अधिकारी
– उपप्रादेशिक परिवहन अधिकार्याची 60 पैकी 20 पदे रिक्त
नागपूर :- उपराजधानीत 18 लाखांच्यावर वाहनांची संख्या आहे. ऑटोरीक्षांची 20 हजार तर राज्याचा विचार केल्यास वाहनांची संख्या कोटींच्या वर जाते. अशी स्थिती असतानाही नागपूर शहर आणि ग्रामीण कार्यालयात कायमस्वरुपी प्रादेशिक परिवहन अधिकारी नाही. यासोबतच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) पद रिक्त आहे. ग्रामीण आणि पूर्व नागपुरातील कार्यालयात उप प्रादेशिक अधिकारी आहेत.
राज्याचा विचार केल्यास प्रादेशिक परिवहन अधिकार्यांची 28 पैकी केवळ पाच पदांवर अधिकारी आहेत. तर उपप्रादेशिक परिवहन अधिकार्याची 60 पैकी 20 पदे रिक्त आहेत. अशी माहिती माहिती अधिकारांतर्गत उपलब्ध झाली आहे. अमरावती कार्यालयाचे राजाभाउ गित्ते यांच्याकडे नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते नागपूर ग्रामीणचा सुध्दा कारभार पाहतात. एकंदरीत त्यांच्यावर 11 जिल्ह्याची जबाबदारी आहे.
तर दुसरीकडे शहर आरटीओ कार्यालयात उप प्रादेशिक परिवहन अधिकार्याचे पद रिक्त असून ते एआरटीओ सांभाळीत आहेत. परिवहन आयुक्त कार्यालय (मुंबई), मुंबई (मध्य), ठाणे, अमरावती आणि नांदेड वगळता राज्यात कुठल्याही कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी नाहीत. परिणामी वाहन परवाना, परमीट, फिटनेस प्रमाणपत्रांची कामे रखडलेली आहेत.
परमिट, फिटनेसची कामे रखडली
प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत अनेक अधिकारी दोनपेक्षा अधिक पदे सांभाळत आहेत. रिक्त पदे आणि अतिरिक्त पदभार या सर्वांचा परिणाम नियमित कामांवर होत असून नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणीत वाढ झाली आहे. नागरिकांचे नियमित कामे रखडली असून वाहन परवानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. परमिट, फिटनेसची कामे खोळंबलेली आहेत. रिक्त पदे तातळीने भरावी आणि नागरिकांचा त्रास कमी करावा या आशयाचे निवेदन विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार व विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांना दिले आहे.
विलास भालेकर
अध्यक्ष, विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन