संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
इच्छुक उमेदवारांचा सोशल मीडियातून प्रचार
ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी जोरात
कामठी, ता.10 – कामठी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.या २७ ही ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या ७० हजार ६५४ असून यामध्ये १२ हजार ५३७ अनु जाती तर २९७९ अनु जमातीची लोकसंख्या आहे तर या २७ ग्रा प मध्ये ९३ प्रभाग राहणार असून एकूण २४७ सदस्य निवडून येणार आहेत.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. कामठी तालुक्यातील मुदत संपण्याच्या व निवडणूक होणाऱ्या २७ ग्रामपंचायतीमध्ये येरखेडा, रणाळा, बिना, भिलगाव, खैरी, खसाळा, सुरादेवी, खापा, कढोली, भोवरी, आजनी, लिहिगाव, कापसी(बु), गादा, सोनेगाव, गुमथी, आवंढी, गुमथळा, तरोडी बु, परसाड, जाखेगाव, केम, दिघोरी, आडका, शिवणी, भुगाव, वडोदा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या २७ ही ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या ७० हजार ६५४ असून यामध्ये १२ हजार ५३७ अनु जाती तर २९७९ अनु जमातीची लोकसंख्या आहे तर या २७ ग्रा प मध्ये ९३ प्रभाग राहणार असून एकूण २४७ सदस्य निवडून येणार आहेत यामध्ये अनु जातीचे ४२, अनु जमातीचे ७ तर उर्वरीत सर्वसाधारण सदस्यांचा समावेश राहणार आहे. या २७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असून या पदाचे आरक्षण आधीच घोषीत करण्यात आले आहे.
बॉक्स
इच्छुक उमेदवारांचा सोशल मीडियातून प्रचार;
कामठी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आत्तापासूनच कामाला लागले आहेत.
ग्रामपंचायत या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वाढदिवस, दीपावली सण किंवा अनेक कारणांनिमित्त वस्तीत जाऊन होणार्या निवडणुकीसंदर्भात नागरिकांशी चर्चा करून पुढील काळात वस्तीवरील असणार्या सर्व समस्या सोडवू; परंतु होणार्या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ द्या, अशी आर्जव करीत आहेत. कितीतरी उमेदवारांनी आत्तापासूनच सोशल मीडियावर भावी ग्रामपंचायत सदस्य, भावी सरपंच, अशा विविध पोस्ट टाकून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्टेटस ठेवून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.