मुंबई :-छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी काम करत आहे. भाजपा सरकारने देशात- राज्यात विकासाचा मोठा टप्पा पार केल्याने भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने 500 बिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. राज्यात महायुती सरकारने केलेल्या विकास कामांची पावती मतदार आगामी निवडणुकीत देतील,असा विश्वास भाजपा चे राष्ट्रीय प्रवक्ते खा.सुधांशू त्रिवेदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. खा. त्रिवेदी यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल, माध्यम विभाग केंद्रीय समन्वयक आ.अतुल भातखळकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक,प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर व्होट जिहादचे प्रकार करण्याची तयारी सुरू असल्याने मतदारांनी हे षडयंत्र समजून घेत ते हाणून पाडले पाहिजे असे आवाहनही खा. त्रिवेदी यांनी केले.
खा.त्रिवेदी यांनी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली . खा.त्रिवेदी म्हणाले की, या निवडणुकीत भाजपा – महायुती समृद्धी, सुरक्षा, समरसता आणि स्वाभिमान हे चार मुख्य मुद्दे घेऊन मतदारांपुढे जात आहे. आमचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी महविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर गेला. कर्नाटक,गुजरात आघाडीवर गेले होते. आमच्या काळात 2023-24 मध्ये महाराष्ट्रात एक लाख 25 हजार कोटी रुपयांची तर कर्नाटकमध्ये फक्त 54 हजार कोटींची गुंतवणूक झाली. यावरूनच भाजपा – महायुतीचे सरकार विश्वासार्ह आहे हे लक्षात येते.
महायुती सरकारने महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली आहे. इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, रो रो सेवा, रोप वे अशी विकास कामे करतानाच महिलांच्या सशक्तीकरणासाठी माझी लाडकी बहिण अशा योजना महायुती सरकारने सुरू केल्या.सामाजिक समरसतेसाठी दलित चेंबर ऑफ कॉमर्स, बार्टी सेंटरमध्ये कौशल्य विकास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ठिकाणी पंचतीर्थांचे निर्माण, डॉ.आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडन येथील निवासस्थानाचे स्मारक करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या विकास कामांची दखल घेत मतदार महायुतीला भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास खा. त्रिवेदी यांनी यावेळी व्यक्त केला.
वक्फ कायद्यातील सुधारणांबाबत विरोधक गप्प का ?
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे बद्रुद्दीन अजमल यांनी दिल्ली विमानतळच नव्हे तर भारतीय संसदेची जागाही वक्फ च्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. मात्र एकाही विरोधी पक्षाने अजमल यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत दाखविली नाही. मतांसाठी राष्ट्रीय सुरक्षेसह कोणत्याही मुद्द्यावर तडजोड करण्याची विरोधकांची तयारी आहे, असा घणाघाती हल्ला खा. त्रिवेदी यांनी चढविला.