Ø कामगारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी विशेष अभियान
नागपूर :- नागपूर हे वाढते औद्योगिक शहर असून येथील औद्योगिक वसाहतीत सुमारे 40 ते 50 हजार कामगार रोजगारासाठी स्थायिक झाले आहेत. हे कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिल्या.
निवडणूक विभागाद्वारे मतदार नोंदणीसाठी ‘मिशन युवा इन’ व ‘मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण’ कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (बी.एम.ए.) सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण माहीरे, बी.एम.ए. चे अध्यक्ष नितीन लोणकर व सचिव शशिकांत कोठारकर, क्षेत्रव्यवस्थापक निशांत गिरी, हिंगणाच्या तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर व एमआयडीसीचे परिसरातील विविध कंपन्यांचे प्रतीनिधी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रत्येक कारखाना मालकाने आपल्या कारखान्यातील प्रत्येकाची नोंद मतदार यादीत झाली अथवा नाही याची खातरजमा करावी. त्यासाठी कामगारांना मदत करावी. जिल्ह्याचा निवडणूक विभाग औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योजकांना, कारखाना मालकांना मदत करेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातून ७५ हजार नवमतदारांची नोंदणी करायची असून या राष्ट्रीय कर्तव्यात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात कार्यरत विविध उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते सफाई कामगार पर्यंतची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी औद्योगिक आस्थापना व औद्योगिक कामगार संघटनांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. इटनकर यांनी केले.
वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी आता जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि सप्टेंबर महिन्यात एक तारखेला असे वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नवमतदार नोंदणीसाठी नमुना-सहा, नाव कमी करण्यासाठी नमुना-सात तर मतदार संघात नाव स्थानांतरित किंवा कोणतेही बदल वा सुधारणा करण्यासाठी नमुना-आठ चा अर्ज भरून द्यावा. मतदारनोंदणीची कार्यवाही जलद करण्यासाठी ‘व्होटर हेल्पलाईन’ या ऑनलाईन मोबाईलॲप चा वापर करण्याच्या सूचना डॉ. इटनकर यांनी दिल्या.
उपजिल्हाधिकारी माहीरे यांनी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत मतदारनोंदणी सुलभ करण्यासाठी निवडणूक विभागातर्फे बीएमएच्या सभागृहात तात्पुरत्या स्वरूपात मतदार नोंदणी सुविधा केंद्र सोमवार 21 ऑगस्टपासून सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.
निवडणूक सतत सुरू राहणारी प्रक्रिया असून जी मंडळी वर्षानुवर्षे या ठिकाणी काम करतात त्यांचे मतदार कार्ड स्थानिक स्तरावर तयार करणे आवश्यक आहे. मात्र असे करताना या कामगारांना पुन्हा अन्यत्र गेल्यानंतर तेथील मतदार यादीतून नाव काढून ज्या ठिकाणी बदलून गेले तेथे नोंद करता येते, हे सांगणे देखील आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आपला रहिवास असेल त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये समाविष्ट होणे गरजेचे असून लोकशाही व्यवस्थेमध्ये आपला मताचा अधिकार बजावणे आवश्यक असल्याचे कामगारांना कारखाना मालकांनी समजावून सांगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बैठकीला निवडणूक विभाग व एम.आय.डी.सी. बुटीबोरीचे अधिकारी तसेच विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.