– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण
नागपूर :- सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर स्थित वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्यावतीने ७ ऑगस्ट या ‘राष्ट्रीय हातमाग’ दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस व रेशीमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.
पारंपरिक हातमाग विणकर कामगारांना प्रोत्साहन देणे आणि हातमाग क्षेत्राचे सामाजिक आर्थिक महत्व अधोरेखित करण्याच्या उद्दिष्टाने ७ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग आयुक्तालयातर्फे ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ऑगस्ट रोजी एमकेएसएस स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी देवनगर यांच्या सहकार्याने १० वा राष्ट्रीय हातमाग दिवस आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याहस्ते तथा वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा आणि रेशीम संचालनालयाच्या संचालक वसुमना पंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर पारंपरिक वस्त्रांचा फॅशन शो, प्रश्नमंजुषा, ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८’ चे सादरीकरण आदी कार्यक्रम होणार आहेत.
विभागीय आयुक्तालयाच्या प्रांगणात हातमाग प्रदर्शन
सामान्य जनतेपर्यंत पारंपरिक वस्त्रांची माहिती पोहचविणे व जनजागृती करण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात एक दिवसीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याहस्ते होणार आहे.
राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेचे बक्षीस वितरण
सदर परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे ९ ऑगस्ट रोजी १० व्या ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ कार्यक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस व रेशीमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे, अशी माहिती पंडा यांनी दिली.