Ø 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थी देत आहेत परीक्षा
Ø 5 हजार 86 मुख्य केंद्रांवर परीक्षेचे आयोजन
नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) लेखी परीक्षा सुरु असून 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. मंडळाच्यावतीने परीक्षार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
राज्यातील 8 लाख 59 हजार 478 विद्यार्थी आणि 7 लाख 49 हजार 911 विद्यार्थीनी आणि 56 तृतीयपंथीयांनी 23 हजार 272 माध्यमिक शाळांमधून या परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत 5 हजार 86 मुख्य केंद्रावर या परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण महामंडळाने परिक्षार्थ्यांसाठी विविध सुविधा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांकडून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आवेदन पत्र स्विकारण्यात आली. मंडळाने 2 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. परीक्षांच्या कालावधीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता किंवा परिक्षेच्या भीतीने येणारे दडपण यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर 10 समुपदेशकांची तर विभागीय स्तरावर मंडळांमध्ये व जिल्हानिहाय प्रत्येकी 2 याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मंडळ व 9 विभागीय मंडळांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी 10 मिनीटे वाढवून देणे आदी सुविधा शिक्षण महामंडळाच्यावतीने देण्यात आल्याचे नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव चिंतामन वंजारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.