– ‘सांझाग्राम’चे अमोल व जयश्री मानकर यांचा गौरव
यवतमाळ :- येथील मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘वंदन सन्मान’ पुरस्काराने अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंझ मोझरी येथील ‘सांझाग्राम’चे संचालक अमोल व जयश्री मानकर दाम्पत्यास रविवारी, १३ ऑक्टोबर रोजी सन्मानित केले जाणार आहे. हा सोहळा येथील महेश भवनमध्ये सकाळी ११ वाजता होणार आहे.
शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व ५१ हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अंबाजोगई येथील मानवलोक प्रतिष्ठानचे कार्यवाह अनिकेत लोहिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून मन:शक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथील कार्यकारी विश्वस्त प्रमोद शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
अमोल आणि जयश्री मानकर हे दाम्पत्य समाजाला विचारांतून कृतीकडे नेणाऱ्या समर्पण प्रतिष्ठानद्वारे संचालित सांझाग्राममध्ये गेल्या २० वर्षांपासून महिला सक्षमीकरण आणि पुनर्वसनाचे काम करत आहे. मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तसेच पुरस्कार निवड समितीने सांझाग्रामच्या अमोल व जयश्री मानकर यांची ‘वंदन सन्मान’ पुरस्कारासाठी एकमताने निवड केली. रविवार, १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण साहेळ्यात इतरही सामाजिक संस्थांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.