– उमेदवारांनी समितीकडून प्रमाणपत्र घ्यावे
यवतमाळ :- राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचा दिवस व आदल्या दिवशी वर्तमानपत्रात प्रसिध्द होणाऱ्या प्रचार जाहिरातींचे प्रमाणिकरण आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी जाहिरात प्रमाणित करूनच प्रसिद्धीस द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.
वर्तमानपत्रांमध्ये मतदानाचा दिवस व मतदानाच्या आदल्या दिवशी कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, निवडणूक प्रक्रियेला खिळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता म्हणून आयोगाने या दिवशी प्रचार जाहिरातींचे प्रमाणिकरण करून प्रसिद्धीस देण्याबाबत दिशानिर्देश जारी केले आहे.
कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत मतदानाच्या दिवशी दि.२० नोव्हेंबर रोजी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे दि.१९ नोव्हेंबर रोजी मुद्रीत माध्यमामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.
सदर जाहिरात राज्य, जिल्हा स्तरावरील माध्यमपूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करुन नये. तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना या दोन दिवसाच्या कालावधीत मुद्रीत माध्यमामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडे अर्ज करावा.
यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गार्डन हाल येथे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रन समितीचे कार्यालय आहे. उमेदवारांनी या दोन दिवशी प्रचार, राजकीय जाहिराती वर्तमानपत्रात प्रसिध्द करावयाच्या असल्यास या समितीकडे अर्ज देऊन जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घ्यावे व त्यानंतरच जाहिराती प्रसिद्धीस द्यावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.पंकज आशिया यांनी कळविले आहे.