केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे राबविला जात आहे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट-फेस ऑथेंटिकेशन उपक्रम
नागपूर :- केंद्र शासनाच्या सेवेतील निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी राष्ट्रव्यापी मोहीम केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे राबविली जात आहे . केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी मोहीम 11 नोव्हेंबर शुक्रवार रोजी स्टेट बँक ऑफ इंडीया- एसबीआय, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग , किंग्सवे नागपूर शाखा, येथे राबविली गेली. या शिबिरामध्ये निवृत्तीवेतनधारकांचे ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट-फेस ऑथेंटिकेशन करण्यात आले. यावेळी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे उपसचिव रमेशचंद्र सेठी, या विभागाचे सल्लागार हरजित सिंग , स्टेट बँक ऑफ इंडीया- एसबीआय नागपूरचे नोडल अधिकारी सुब्रोतो मुखर्जी यांनी निवृत्तीवेतनधारका नागरिकांना मार्गदर्शन करीत माहिती दिली.
निवृत्तीवेतन धारकांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला आणि या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून दिल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. या पेन्शनधारकांना त्यांच्या मोबाईल फोनमध्ये फेस ऑथेंटिकेशन जीवन प्रमाण अॅप कसे डाउनलोड करावे आणि त्यांच्या फोनवरून जीवन प्रमाणपत्र कसे द्यावे याबद्दल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. लाइफ सर्टिफिकेट 60 सेकंदात तयार केले जाते आणि मोबाईल फोनवर एक लिंक पाठवली जाते जिथून ते डाउनलोड केले जाऊ शकते.
मागील वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये केंद्रीय कार्मिक विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्मार्टफोनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे ‘ फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचे’ लोकार्पण केले होते. सर्व नोंदणीकृत पेन्शनर्स असोसिएशन, पेन्शन वितरण बँका, केंद्रीय मंत्रालय/विभाग आणि केंद शासन आरोग्य सेवा- सीजीएचस वेलनेस सेंटर यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट-फेस ऑथेंटिकेशन’ तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यापूर्वी जीवन प्रमाणपत्र भौतिक स्वरूपात सादर करावे लागत होते आणि त्यासाठी वृद्ध पेन्शनधारकांना तासन्तास बँकेबाहेर रांगेत उभे राहावे लागत होते. आता, एका बटणाच्या क्लिकसरशी हे शक्य झाले आहे. मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक/पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक यासंबंधीचे तपशील आवश्यक आहे. ही सुविधा राज्य सरकारच्या कर्मचार्यांना आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात वितरण अधिका-यांमार्फत देखील उपलब्ध आहे.. या कार्यक्रमाला , पेन्शनर्स असोसिएशन आणि स्टेट बँक ऑफ इंडीया, युआयडीआयचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विभागातर्फे नोव्हेंबर महिनाभर मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे सर्व निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल मोडद्वारे सादर करण्यासाठी संबंधित केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले आहे.