कोदामेंढी :- येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रांगणात पाणी साचत असून ते काढण्यासाठी दोन लक्ष रुपयाचे भूमिगत नाली बांधकाम मंजूर असल्याचे ग्रामपंचायत सदस्य व व्यवस्थापन समिती सदस्य विष्णू बावनकुळे यांनी सांगितल्याचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दीपिका मोती कौशिक यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले, मात्र शनिवारला दिनांक 28 सप्टेंबरला शाळेच्या प्रांगणाला तलावाचे स्वरूप आलेले असतानाही त्या शाळेतील मंजूर भूमिगत नालीचे बांधकाम सुरू करण्याऐवजी गावातीलच वार्ड क्रमांक एक मधील गणेश मोहूर्ले ते श्रावण हटवार यांच्या घरादरम्यान असलेल्या उघड्या नालीला बंदिस्त करण्यासाठी त्या नालीवर झाकणे लावण्याऐवजी,ब्रेकरच्या साह्याने तोडून तेथे भूमिगत नालीचे बांधकाम करतांना आकाश कन्स्ट्रक्शन अँड ब्रेकर चे ठेकेदार आकाश शेंडे व त्यांचे मजूर दिसले. याबाबत त्यादिवशी ठेकेदार शेंडे यांनी या भूमिगत नालीचे बांधकाम माझ्याकडेच असल्याचे त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले.
यावरून येथील ग्रामपंचायत प्रशासनाचेही गरिबांच्या लाडक्या जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच असलेल्या उघड्या नालीवर नालीला बंदिस्त करण्यासाठी त्या नालीवर झाकणे लावून बंदिस्त करावे व नवीन नालीचे काम भूमिगतच करावे व अत्यंत गरज अस लेल्या ठिकाणी आधी करावे असा शासनाच्या आदेश असूनही व यावर यापूर्वी झालेल्या अनेक ग्रामसभेत गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय ग्रामसभेत लक्षातही आणून दिला होता व तसा ठराव घेण्यासही सांगितले होते. तरीसुद्धा या आदेशाकडे ग्रामपंचायतच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या येथील काँग्रेस पक्षाचे सरपंच आशिष बावनकुळे गावात मुक्कामी राहत नसून मागील तीन ते चार महिन्यांपूर्वीपासून ते रामटेक येथून अपडाऊन करत असल्याने त्यांचे गावाकडे पूर्ण लक्ष राहत नसल्याचे व ते भ्रमणध्वनी वरूनही वारंवार संपर्क केल्यास प्रतिसाद देत नसल्याचे येथील तेली समाजाचे अध्यक्ष केशव बावनकुळे यांनी सदर वार्ताहरला भेटून सांगितले.