– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील उर्दू विभागाच्या वतीने विशेष व्याख्यान
नागपूर :-भारतीय संस्कृतीत, आपल्या रक्तांमध्ये उर्दू भाषा रुजली आहे. या भाषेचा जन्म भारतात झाला असून तिच्या संवर्धनात सर्वच धर्मातील नागरिकांचा मोठा वाटा राहिला आहे. उर्दू भाषा ही राष्ट्रीय एकात्मतेची भाषा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. सह अभ्यासक्रम गती विधी अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील उर्दू विभागाच्या वतीने ‘उर्दू साहित्यातील नवीन दिशा’ या विषयावर शनिवार, २५ फेब्रुवारीला विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची अध्यक्षता करताना प्र-कुलगुरू डॉ. दुधे बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उर्दू इतिहासकार शोधकर्ता तसेच कवी डॉ. सर्फुद्दीन साहिल, सह अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, उर्दू विभाग प्रमुख डॉ. संतोष गिर्हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उर्दू विभाग प्रमुख डॉ. संतोष गिर्हे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सहअभ्यासक्रम गतीविधीचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य वाढीत अशा कार्यक्रमांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे ते म्हणाले. विशेष अतिथी सहअधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी मार्गदर्शन करताना उर्दू ही शायरीची भाषा असून तिची गोडी विविध प्रांतात बदलत जात असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. सर्फुद्दीन साहिल यांनी मार्गदर्शन करताना उर्दू एक आधुनिक भाषा असल्याचे सांगितले. जगामध्ये होत असलेल्या बदलात अनेक उतार चढाव जिल्ह्याची ताकद या भाषेत आहे. विषयानुरूप उर्दू भाषा कशा प्रकारे नवीन नवीन दिशांनी प्रवास करीत असल्याचा उलगडा केला. बदलत्या जगासोबत उर्दू भाषा देखील कात टाकत नवीन रूपात समोर आली. विविध दिशांचा प्रवास करून आज डिजिटल युगात देखील उर्दू भाषा टिकून असल्याचे साहिल म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. समीर कबीर यांनी केले तर आभार डॉ. वसमत कौसर यांनी मानले.
व्याख्यानानंतर मुशायरा
व्याख्यानानंतर मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागपूर शहरातील प्रसिद्ध शायरी करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या रचना करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये नईम नासिर, अजहर हुसेन, कुणाल दानिश, मधु गुप्ता, स्वाती सानी, समीर कबीर, सर्फुद्दीन साहिल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शाईस्ता तबस्सउम, डॉ. असमत कौसर, डॉ. समीर कबीर, डॉ. सुमैय्या अफशां, डॉ. तरन्नूम नियाज, डॉ. महेर. गुल्फिशा अंजुम सना यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रयत्न केले.